प्रमाणपत्रासाठी ५० रुपयांची लाच घेताना कोतवाल जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 06:34 PM2019-07-02T18:34:31+5:302019-07-02T18:35:47+5:30
लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून कारवाई
उस्मानाबाद : वाशी तहसील कार्यालयातील कोतवालास ५० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जेरबंद केले. खासरा व जनगणना प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने उपरोक्त रक्कम घेतली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रादारास जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयातून १९५१ सालचे खासरा व जनगणना अशी दोन पमाणपत्रे हवी होती. यासाठी ते सातत्याने तहसील कार्यालयात चकरा मारीत होते. मात्र, सदरील कामासाठी कोतवाल लक्ष्मण साहेबा शिंदे हा लाचेची मागणी करीत होता. वारंवार विनंती करूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात व पोनि विनय बहीर यांनी तक्रारीची शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर मंगळवारी वाशी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात (क्र.९) सापळा लावला. यावेळी कोतवाल शिंदे यास ५० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. संबंधिताविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंर्तगत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.