दर वाढवूनही मजूर टंचाई कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:24 AM2021-01-10T04:24:47+5:302021-01-10T04:24:47+5:30
पाथरुड : यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु, सततच्या हवामान बदलामुळे ...
पाथरुड : यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु, सततच्या हवामान बदलामुळे या हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, पिकांवर फवारणी करण्यासह इतर कामांसाठी भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात मजुरांची टंचाई जाणवत आहे.
सध्या एकीकडे तुरीची काढणी सुरु असून, दुसरीकडे रोगराईला अटकाव करण्यासाठी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी देण्यासह फवारणी करण्याचे काम वाढले आहे. यासाठी मजुरांची गरज आहे. अनेक मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता नाईलाजाने अनेक कामे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत.
चौकट.....
कृषी यंत्रानी घेतली मजुरांची जागा
शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱी शेती कामांसाठी नवनवीन यंत्रे घेत आहेत. याद्वारे नांगरणी करणे, पाळी घालणे, तूर काढणी, पेरणी करणे, फवारणी करणे ही कामे होत आहेत. यातून वेळ वाचत असला, तरी यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे.
तीन वर्षांत दुप्पट वाढ
तीन वर्षांपूर्वी शेतीकामासाठी पुरुषांची मजुरी अडीचशे रुपये तर महिलांची मजुरी १५० रुपये प्रतिदिवस अशी होती. परंतु, यंदा पुरूषांना चारशे रुपये तर महिलांना अडीचशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे.
प्रतिक्रिया........
मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे फवारणी, खत घालणे, खुरपणी अशी मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत.
- विलास गावडे, शेतकरी, पाथरुड.