लाडाची लेक सीमेवर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:34 AM2021-08-23T04:34:35+5:302021-08-23T04:34:35+5:30
सध्या मुली किंवा महिला चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी किंवा डेहराडून येथील इंडियन मिल्ट्रीस अकॅडमी या संस्थांसाठीची प्रवेश परीक्षा ...
सध्या मुली किंवा महिला चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी किंवा डेहराडून येथील इंडियन मिल्ट्रीस अकॅडमी या संस्थांसाठीची प्रवेश परीक्षा देऊन लष्करात दाखल होतात. मात्र, मुली, महिलांनी एनडीएची परीक्षा देऊन लष्करात दाखल होण्याची तरतूद नव्हती. याविरोधात ॲड. कुश कार्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर १८ ऑगस्ट रोजी निर्णय देण्यात आला.
लष्करात प्रवेशासाठी...
एनडीए, आयएमए या माध्यमांद्वारे लष्करात प्रवेश करता येतो. त्यातील आयएमए आणि ओटीएच्या माध्यमातून मुलींना लष्करात प्रवेश मिळतो; मात्र एनडीएतून मुलींना प्रवेश दिला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हा प्रश्नही आता निकाली निघाला आहे.
लेकींनी मानले न्यायालयाचे आभार
लष्करात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच बाळगले आहे. त्यामुळेच एनसीसीमध्ये दाखल झाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एनडीएची परीक्षा देता येणार असल्याने आनंद झाला आहे.
- माहविश कुरेशी,
आतापर्यंत मुलांनाच एनडीएची परीक्षा देऊन लष्करामध्ये दाखल होता येत होते. सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हा अधिकार आता मुलींनाही बहाल केला. त्यामुळे कोर्टाचे मन:पूर्वक आभार!
- शबनम पठाण
शालेय जीवनात एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मला लष्करात दाखल व्हायचे आहे. या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न आपण बाळगले आहे. हे स्वप्न काेर्टाच्या निर्णयामुळे साकारता येणार आहे.
- प्रिया ढोबळे
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल...
सुप्रीम कोर्टाने १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार आता मुलींनाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा येत्या ५ सप्टेंबरला होणार आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला होणार असून निर्णयाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि जाहिरात करण्याचा आदेश कोर्टाने युपीएससीला दिला आहे.
शहरात १११ एनएसीसीच्या मुली
शहरातील जिल्हा परिषद मुलींच्या शाळांत ६० मुली, भोसले हायस्कूलमध्ये १७ मुली, भारत विद्यालयात १७ मुली, छत्रपती शिवाजी विद्यालयात १७ मुली अशा एकूण १११ मुली एनएसीसीमध्ये आहेत. त्यातील इच्छुक मुलींना एनडीएची परीक्षा देऊन लष्करात जाता येणार आहे.