दोन्ही कॉंग्रेसमधील नेते भाजपात येत आहेत; आता त्यांच्याकडे कोणी राहते की नाही, अशी अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:47 PM2019-07-19T14:47:04+5:302019-07-19T14:50:53+5:30
कार्यकर्त्यांनी ही भाजपची जागा, ही सेनेची जागा असे करू नये
तुळजापूर (जि़ उस्मानाबाद) : भाजप-सेनेसह घटक पक्षांची शंभर नव्हे तर दोनशे टक्के युती होणारच आहे़ वेगवेगळे लढण्याचा विषयच नाही़ कार्यकर्त्यांनी ही भाजपची जागा, ही सेनेची जागा असा विचारही डोक्यात आणू नये़ अन्यथा पाडापाडी होईल़ मग आपले सरकार कसे येईल? असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुळजापुरात कार्यकर्त्यांनाच विचारला़
भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजापुरात कार्यकर्ता मेळावा घेतला़ यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना युतीचा विचार न करता विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या़ ते म्हणाले, नागरिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे़ राज्यातही सरकारने चांगली कामगिरी केली आहे़ लोक खुश आहेत़ त्यामुळे पुन्हा एकदाच आपलेच सरकार येईल.
मागून आलेल्या वंचित आघाडीने लोकसभेत काँग्रेस -राष्ट्रवादीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे़ या दोन्ही पक्षातील नेते भाजपात प्रवेश करीत आहेत़ आता त्यांच्याकडे कोणी राहते की नाही, अशी अवस्था झाली आहे़ पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले नाही़ त्यामुळे कुठलाही किंतु मनात न आणता विधानसभेच्या तयारीला लागा, अशी सूचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली़
२०२४ ला बारामती जिंकूच
बारामतीत काम झाल्यामुळेच राष्ट्रवादी तेथे जिंकू शकली़ आम्ही ही जागा जिंकू शकलो नसलो तरी़ आमचे प्रयत्न सुरुच आहेत़ मी आठवड्यातून एकदा बारामतीला जात असतो़ यावेळी नाही तरी २०२४ ला बारामती नक्कीच जिंकू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले़