वाशी पाणी याेजनेच्या पाईपलाईनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:33+5:302021-05-10T04:32:33+5:30

लाखाे लीटर पाण्याचा अपव्यय -गळती झालेले पाणी थेट शेतीसाठी मुकुंद चेडे वाशी : शहर पाणीपुरवठा याेजनेच्या पाईपलाईनला जागाेजागी गळती ...

Leakage of Vashi water scheme pipeline | वाशी पाणी याेजनेच्या पाईपलाईनला गळती

वाशी पाणी याेजनेच्या पाईपलाईनला गळती

googlenewsNext

लाखाे लीटर पाण्याचा अपव्यय -गळती झालेले पाणी थेट शेतीसाठी

मुकुंद चेडे

वाशी : शहर पाणीपुरवठा याेजनेच्या पाईपलाईनला जागाेजागी गळती लागली आहे. त्यामुळे लाखाे लीटर पाण्याची नासाडी हाेत आहे. असे असतानाही नगर पंचायत प्रशासन ‘हाताची घडी’ साेडण्यास तयार नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गळती झालेले पाणी थेट शेतीसाठी उपयाेगात आणले जाऊ लागले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा याकडे लक्ष देणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. अकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबीय दिवसभर घरीच असल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. असे असतानाच दुसरीकडे नगर पंचायतीकडून मात्र, तांत्रिक अडचणी पुढे करीत शहरवासियांना पाणीपुरवठा करताना विलंब लावला जात आहे. दाेन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्ष तसे हाेताना दिसत नाही. परिणामी नागरिकांना वर्षभराची पाणीपट्टी भरूनही हंडाभर पाण्यासाठी कुपनलिकेवर जावे लागत आहे, तर काहींना खासगी टॅंकरच्या माध्यमातून गरज भागवावी लागत आहे.

एकीकडे तांत्रिक अडचणींचा फेरा पाठ साेडण्याचे नाव घेत नसताना दुसरीकडे नगर पंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे जलवाहिनीला जागाेजागी गळती लागली आहे. फारडी फाटा, भूम - पारडी रस्त्यावरील घाटाच्या वरचा माथा, औरंगाबाद - साेलापूर महामार्गालगत घुले यांच्या माळावर पाणी माेठ्या प्रमाणात वाया जात आहे. यापैकीच एका ठिकाणी चक्क पाण्याचा डाेह साचला आहे. साचलेले हे पाणी शेतकरी पाईप टाकून शेतीसाठी उपयाेगात आणत आहेत. त्यामुळे प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात असले तरी शहरापर्यंत पाेहोचेपर्यंत लाखाे लीटरची तूट येत आहे. सदरील गळती दुरूस्त करण्यासाठी नगर पंचायतीने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु, तसे हाेताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम टंचाईलाही ताेंड द्यावे लागत आहे.

चाैकट...

नुसत्याच बैठका...

शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने ओरड झाल्यानंतर नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या हाेत्या. मात्र, फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे याबाबतीत मुख्याधिकारी यांनी ठाेस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा वाशीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

ओरड कायम...

वाशी शहरात काही भागात दाेन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा हाेताे, तर काही भागात सात ते आठ दिवसाआड पाणी मिळते, अशी ओरड मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या अनुषंगाने नगर पंचायतीकडून प्रयत्नही करण्यात आले. परंतु, ही ओरड पूर्णपणे बंद करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

Web Title: Leakage of Vashi water scheme pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.