साहित्य संमेलनाचा समारोप अध्यक्षांविनाच; प्रकृती अस्वास्थ्यामुळे फादर दिब्रिटो परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 01:19 AM2020-01-12T01:19:55+5:302020-01-12T01:20:17+5:30
मुंबईच्या रुग्णालयात केले दाखल
प्रज्ञा केळकर-सिंग
संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच वसईला परतले. त्यामुळे संमेलनाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांविना समारोप होणार आहे. त्यांचे समारोपाचे भाषण वाचून दाखविले जाईल, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले म्हणाले.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी फादर दिब्रिटो व्हीलचेअरवरून आले होते. मला ५ जानेवारीपासून अचानक कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी दवाखान्यात दाखल व्हायला सांगितले. मात्र, संमेलनात रसिक वाट पाहत असल्याने त्यांच्या प्रेमापोटी मी उस्मानाबादला आलो. मात्र, त्रास असह्य झाल्याने मला वसईला परत जाण्याची मोकळीक द्यावी, अशी विनंती त्यांनी अध्यक्षीय भाषणानंतर साहित्यप्रेमींना केली.
उद्घाटनानंतर फादर दिब्रिटो शुक्रवारी रात्रीच्या गाडीनेच वसईला रवाना झाले. त्यांना शनिवारी सकाळी वांद्रा येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सिटी स्कॅन, एमआरआय आदी तपासण्या केल्यावर मणक्यातील एक नस दाबली गेल्याने डॉक्टरांनी छोटी शस्त्रक्रिया करावी लागू शकेल, असा सल्ला दिल्याचे फादर दिब्रिटो यांचे भाचे जेम्स लोबो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यापूर्वी महाबळेश्वर येथील संमेलनात वाद उद्भवल्याने आनंद यादव यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते संमेलनही अध्यक्षांविना पार पडले. मात्र, समारोपाला संमेलनाध्यक्ष उपस्थित नसल्याची संमेलनाच्या ९३ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
अध्यक्षांचे भाषण वाचून दाखवू
फादर दिब्रिटो यांची प्रकृती ठीक नसतानाही संमेलनाला आले, हीच खूप मोठी बाब आहे. त्रास होत असूनही त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. समारोपाला त्यांची उणीव जाणवेलच; मात्र तब्येतही महत्त्वाची आहे. त्यांचे समारोपाचे भाषण वाचून दाखवण्यात येईल. - कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
महत्त्वाचे ठराव नाहीतच
अभिजात भाषेचा दर्जा, बारावीपर्यंत सक्तीची मराठी, स्थानिक प्रश्न या पलीकडे जाऊन नागरिकत्व दुरुस्ती कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत झालेले आक्षेपार्ह लेखन, विद्यार्थ्यांवरील हल्ला या सध्याच्या चर्चेतील महत्त्वाच्या घटनांबाबतचे ठराव यंदाच्या खुल्या अधिवेशनात मांडले जाणार नाहीत.