- चेतन धनुरे
उस्मानाबाद : उस्मानाबाद मतदारसंघाचे विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डावलून शिवसेनेने माजी आ़ ओम राजेनिंबाळकरांची उमदेवारी जाहीर झाल्याच्या दोन तासांतच राष्ट्रवादीनेही आ़राणा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली़ कट्टर राजकीय व कौटुंबिक हाडवैर असलेल्या या दोन घराण्यातील उमेदवारीने उस्मानाबादचा राजकीय आखाडा चांगलाच रंगणार आहे़
उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी नाकारत शिवसेनेने शुक्रवारी माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली़ गायकवाड यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी शिवसेनेचे उपनेते आ़तानाजी सावंत यांचा गट अत्यंत सक्रीय बनला होता़ गेल्या काही दिवसांपासून हा गट मुंबईतच तळ ठोकून होता़ अखेर त्यांच्या प्रयत्नाला ‘मातोश्री’ने साद देत गायकवाड यांचा पत्ता कापला़ उमेदवारीची ही घोषणा झाल्याच्या अवघ्या दोनच तासात राष्ट्रवादीने माजी मंत्री आ. राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
दोन घराण्यातील वैर सर्वश्रुत
जेनिंबाळकर यांच्यातील राजकीय व कौटुंबिक वैर संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच़ २००४ मध्ये उस्मानाबाद विधानसभेला डॉ़पद्मसिंह पाटील व पवनसिंह राजेनिंबाळकर आमनेसामने आले़ अटीतटीच्या लढतीत गुलाल डॉक्टरांच्याच भाळी लागला़ त्यानंतर २००९च्या निवडणुकीत पवनराजेंचे पुत्र ओमराजेंना सेनेने मैदानात उतरविले़ तर राष्ट्रवादीने पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा पाटलांना़ या निवडणुकीत ओमराजेंनी मैदान मारले़ तर पुढच्याच २०१४च्या विधानसभेला राणांनी पराभवाची परतफेड करीत ओमराजेंची पाठ लावली़ दोघेही नात्याने चुलतभाऊ असले तरी मागील तीन निवडणुकांपासून चालत आलेले या कुटूंबातील राजकीय द्वंद्व यावेळी लोकसभेतही कायम राहिले आहे़ त्यामुळे लढत रंगणार, यात शंका नाही़
का कापली गायकवाडांची उमेदवारी?महाराष्ट्र सदनात रोजेकऱ्यासोबत झालेला वाद, त्यानंतर विमान कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर खासदार रवी गायकवाड देशभर चर्चेत आले होते़ त्यापेक्षा स्थानिक मतदारसंघात मात्र, ‘नॉट रिचेबल खासदार’ अशीच चर्चा त्यांच्या पदरी पडली़ खासदार निधी पूर्ण खर्च केला तरी दृश्य विकास झाला नाही, असाही प्रसार झाला़ याचेच भांडवल करीत सेनेचे उपनेते आ़तानाजी सावंत यांच्या गटाने ‘मातोश्री’वर फिल्डिंग लावली़ जवळपास आठ-दहा दिवस तेथेच तळ ठोकून या गटाने गायकवाडांचा पत्ता कापत ओमराजेंची उमेदवारी आणली आहे़
सोशल मीडियात राजीनाम्यांचा पूऱ़खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याचे वृत्त धडकताच प्रामुख्याने त्यांच्या उमरगा तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियात राजिनामे देत असल्याचे जाहीर केले़ फेसबुक, व्हॉट्सअपवर त्यांचे संदेश झळकू लागले आहेत. ‘आता फक्त रवी सेना’ असे मेसेजेसही झळकू लागले आहेत़