उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी सकाळी छाननी करण्यात आली़ यात ३८ अर्जांपैकी केवळ ५ अर्ज अवैध ठरले आहेत़
उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणा-या २३ जणांनी मंगळवारपर्यंत ३८ अर्ज दाखल केले होते़ या अर्जांची बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली़ त्यात मनोहर पाटील, लिंबाजी राठोड, विष्णु देडे या अपक्ष उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत़ अन्य प्रमुख उमेदवारांसह अपक्ष २० उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत़
यात प्रामुख्याने महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे प्रत्येकी ४ अर्ज, वंचित बहुजन आघाडीचे अर्जून सलगर यांचे २, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांचे ३, खासदार रवी गायकवाड समर्थक माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंड करीत भरलेला व बसपाचे डॉ़शिवाजी ओमन यांच्या १ अर्जाचा समावेश आहे़ २९ मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे़ या कालावधीत कोण-कोण माघार घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़
यामुळे ठरले अर्ज अवैध़अर्ज अवैध ठरलेल्या तीन उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापूर्ण पूर्णपणे व आवश्यक माहिती न भरल्यामुळे अवैध ठरले आहेत़ काहींच्या प्रतिज्ञापत्रावर सूचकांच्या नावांसमोर स्वाक्षरी नसल्यानेही अर्ज अवैध ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़