उस्मानाबाद : पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्हाभरातील खरीप पिके अडचणीत आली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी पिकांना विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने विघ्न निर्माण झाले आहे. तातडीने यात लक्ष घालून सुरळीत वीजपुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अधीक्षक अभियंत्यांना भेटून दिला.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यातच महावितरणकडून सततची लोडशेडिंग व कमी दाबाने विद्युत पुरवठा करणे, अनियमित वीज असे प्रकार सुरू आहेत, तसेच खराब झालेली रोहित्रेही दुरुस्त करून मिळण्यामध्ये अडचण होत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना व शेतातील विहिरीत, बोअरवेल, तळ्यात पाणी असताना महावितरणच्या ढिसाळ नियोजनाने पिकास पाणी देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
या अडचणी सोडवून तातडीने जिल्ह्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांना देऊ केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, नामदेव नायकल, ओम नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, आशिष नायकल, गणेश मोरे, अभिराम पाटील, स्वप्निल पाटील, अभय इंगळे, प्रवीण पाठक, विजय शिंगाडे, हिमत भोसले, सुनील पंगुडवाले उपस्थित होते.