आई-वडिलाचे छत्र हरवल्याने चिमुकल्यांची होतेय उपासमार; आजीच्या खांद्यावर आहे जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 07:44 PM2019-12-14T19:44:03+5:302019-12-14T19:47:00+5:30
६५ वर्षीय आजीच्या खांद्यावर आली पालनाची जबाबदारी
- बालाजी बिराजदार
लोहारा (जि. उस्मानाबाद) : वर्षभरापूर्वी वडिलांचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्तीच गेल्याने तीन चिमुकल्यांच्या पालनाची जबाबदारी आईवर येवून ठेपली. परंतु, मातेचे ममत्वही या चिमुकल्यांच्या नशिबी नव्हते, म्हणून की काय अवघ्या सहा महिन्यातच आईचेही आजारपणातून निधन झाले. त्यामुळे या मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी ६५ वर्षीय आजींवर आली. वाढत्या वयामुळे त्या कामधंदा करू शकत नाहीत. त्यामुळे गावातील चार घरे मागून सध्या निराधार चिमुकल्यांची भूक भागविली जात आहे.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सुकुमार हरीबा कांबळे यांना दोन मुलं व एक मुलगी अशी तीन आपत्य. मोठा मुलगा अवघा १८ वर्षाचा असताना त्याचे अपघातात निधन झाले. दुसरा मुलगा अमोल कांबळे हे हालाखीच्या परिस्थितीमुळे कामाच्या शोधात पत्नी, दोन मुलं व एका मुलीसह पुणे शहरात स्थलांतरित झाले. मिळेल ते काम करुन अमोल संसाराचा गाडा हाकत होते. सर्व काही बरे सुरू असतानाच साधारपणे वर्षभरापूर्वी अमोल यांचे अकाली निधन झाले. घरातील करता पुरूष गेल्याने कांबळे कुटुंब उघड्यावर आले. त्यामुळे कुटुंबाच्या पालन-पोषणाची जबाबदारी आई लक्ष्मी यांच्या खांद्यावर आली. संकटासमोर हार न मानता त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटत होत्या. असे असतानाच अवघ्या सहा महिन्यात लक्ष्मी यांचाही आजारपणातून मृत्यू झाला अन् चिमुकले निराधार झाले.
तेव्हा प्रेमनाथ हा मुलगा ९ वर्षाचा होता. मुलगी आरती चार वर्ष तर अथर्व हा अवघ्या सहा महिन्याचा होता. आई-वडीलांच्या अकाली निधनामुळे चिमुकल्यांच्या पोषणाची जबाबदारी आजी सुकुमार कांबळे यांच्यावर आली. त्यांचे सध्या ६५ वर्ष एवढे वय आहे. वाढत्या वयामुळे त्यांना मोलमजुरीची कामे होत नाहीत. त्यामुळे निराधार चिमुकल्यांचे पोषण करणे कठीण झाले आहे. गावातील चार घरे मागून मिळेल त्या अन्नावर मुलांची भूक भागवित आहेत. काहीवेळा मुलांना अर्धपोटी झोपावे लागते, असे आजी सुकुमार कांबळे सांगतात. अनेकवेळा ग्रामस्था मदतीसाठी धावून येतात. परंतु, अशी मदत कुठपर्यंत पुरेल? असा सवालही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पोटाची भूक भागविण्यासाठी धडपडणाऱ्या चिमुकल्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कानेगाव येथील सुकुमार कांबळे या आजीवर तीन मुले संभाळण्याची जबाबदारी आली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आजींचे वाढते वय लक्षात घेता, मुलांचे पोषण अन् शिक्षणाची कायमस्वरूपी सोय होणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-सतीश कदम, समन्वयक, हॅलो मेडिकल फाऊंडेशन.