लोहारा तालुक्यातील उंडरगाव हे दोन हजार लोकसंख्येचे गाव. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून सरपंचपद रिक्त असतानाच अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने उपसरपंचांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून सरपंच, उपसरपंचांविना ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारीच्या अंकात ‘सरपंचपद रिक्त, त्यात उपसरपंचाचा राजीनामा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी १५ मार्च रोजी लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांना पत्र काढून कोरोनाच्या नियमाचे पालन करत उपसरपंच निवडीसंदर्भात बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदारांनी २२ मार्च रोजी उंडरगाव उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.
मंगळवारी दुपारी उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. याप्रसंगी उपसरपंचपदासाठी महेश ढोबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी अध्यासिन अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी व्ही. बी. पवार होते. यावेळी तलाठी अरुण कांबळे, ग्रामसेवक गोविंद पाटील, माजी उपसरपंच मुरलीधर मोरे, ग्रा. पं. सदस्य रघुनाथ भुसारे, विमल गंगणे, लक्ष्मी शिवकर, लक्ष्मी भुसारे, बलभीम रवळे आदी उपस्थित होते.