कळंब : मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने तालुक्यातील वाकडी (ई) गावातील लोक प्रभावीत झाले असून तीन घराला पाण्याने वेढा दिल्याने अडकलेले १७ व्यक्ती छतावर बसून मदतीची हाक देत आहेत.दरम्यान,याठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले आहे.
काठोकाठ भरलेल्या मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार दिवसापासून पाऊस होत आहे. यास्थितीत पाण्याचा उजवा कालवा व सहा दरवाजातून विसर्ग केला जात असला तरी सातत्यपूर्ण पावसाने आवक वाढत असल्याने मंगळवारी पहाटे पाच वाजता इतर १२ दरवाजातून ही पाणी सोडण्यात आले.
यामुळे विसर्ग वाढल्याने लाभक्षेत्रातील वाकडी (ई) गावात पाणी शिरले आहे. यात गावातील एका वस्तीवरील तीन घराला पाण्याचा वेढा बसला आहे. यामुळे घराच्या छतावर अडकलेले १७ व्यक्ती मदतीची हाक देत आहेत.
▪️प्रशासन गावात दाखल...
दरम्यान, तहसीलदार विद्या शिंदे, मंडळ अधिकारी शंकर पाचभाई, सपोनि वैभव नेटके यांच्यासह अधिकारी गावात दाखल होवून मदतीसाठी प्रयत्नशील आहेत.
▪️एनडीआरएफच्या टिमला पाचारण
वाकडी येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढने शक्य नसल्याने ऊस्मानाबाद येथून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
एकीकडे मांजरा दुथडी वाहत असतानाच इतर भागातील तेरणा, वाशीरा नदीला पुर आला आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे
▪️पशुधन दिले सोडुन
वाकडी येथील काही घरे व गोठ्यांच्या भोवती पाण्याचा वेढा वाढत असल्याचे पाहुन पशुधनाला मोकळे सोडण्यात आले होते. यामुळे पाण्यात हे पशुधन पोहत असल्याचे दिसून येत आहे.
▪️लासरा येथील शाळा पाण्यात
मांजरा पट्ट्यातील लासरा गावाला पुराच्या पाण्याने स्पर्श केला असून गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत पाण्यात सापडली आहे. जवळपास आठ फूट पाणी चढले होते.
▪️विविध मार्गावरील वाहतूक बंद
तालुक्यातील वाशीरा नदीला पुर आल्याने लातूर कळंब राज्यमार्ग आथर्डी गावाजवळ पुलावर पाणी आल्याने बंद झाला आहे. भाटशिरपुरा येथील पुलावरील पाण्यामुळे कळंब ढोकी राज्यमार्ग बंद झाला आहे. कळंब अंबाजोगाई राज्यमार्ग पण पहाटे बंद झाला होता. खामसवाडी, मंगरूळ येथील रस्ते पाण्यामुळे बंद झाले होते. अनेक लहान गावाना जोडणारे रस्ते पाण्यात होते.