दुष्काळात 'माणुसकीची पेरणी', 12 वीच्या मुलींसाठी मोफत शिकवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 12:51 PM2019-01-27T12:51:36+5:302019-01-27T12:54:44+5:30
कँटीनमध्ये चहा पीताना काही शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून मुलींच्या क्लासेससंदर्भात महत्वाची बाब निरीक्षणात आली.
उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब येथील पत्रकार आणि शिक्षकांनी एकत्र येऊन प्रेरणादायी उपक्रमाची पेरणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थींनींसाठी मोफत क्लासेस सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम येथील शिक्षक आणि पत्रकार मंडळींनी सुरू केलंय. या कामी त्यांना गिताई प्रतिष्ठान (माळी नगर) यांची मोलाची साथ मिळाली. सध्या या मोफत क्लासेसचा लाभ 30 ते 35 मुलींना होत असून 5 शिक्षकांकडून विद्यादानाचं काम होत आहे.
क्लासेसच्या नावाखाली एकीकडे गरीब पालकांना आणि विद्यार्थ्यांची मोठा प्रमाणात लुट करण्यात येत आहे. शिकवणीसाठी भरमसाठ फी घेऊन घेऊन शिकांकडून लुबाडणूक करण्यात येत असतानाच कळंब तालुक्यात मुलींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कँटीनमध्ये चहा पीताना काही शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून मुलींच्या क्लासेससंदर्भात महत्वाची बाब निरीक्षणात आली. दुष्काळी परिस्थीतीमुळे शेतकरी अन् गरिबांच्या मुलांना क्लासेसपासून वंचित राहावं लागत असल्याचं निदर्शनास आल्यानं हा उपक्रम सुरू केल्याचं पत्रकार शशिकांत घोंगडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. गिताई प्रतिष्ठान व कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्ताने 12 वी च्या विविध शाखेतील मुलींचे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. यंदाच्या हंगामात 20 टक्केही उत्पन्न मिळालं नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होताना दिसून येतो. तर अनेक मुलीचे विद्यालयीन शिक्षणही बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील मुलींसाठी हे मोफत क्लासेस सुरू केल्याचं घोंगडे यांनी सांगितले.
बारावी विज्ञान शाखेच्या मुलींना सध्या वर्षभर क्लासेसकरीता 25,000 ते 30,000 रुपये लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना क्लासेस लावणे ही दूरची बाब बनली आहे. या गोष्टीचा विचार करून आणि गिताई प्रतिष्ठान व कळंब तालुका पत्रकार संघ यांनी पुढाकर घेत 12 वी च्या मुलींना एक वर्ष मोफत क्लासेस चालू केले आहेत. हे क्लासेस यु व्ही सायन्स अॅकेडमी व ज्ञानज्योती क्लासेस (मार्केट यार्ड) येथे सुरू करण्यात आले आहेत. या शिकवणी वर्गात 5 शिक्षक विद्यादानाचे मोफत काम करत असून सायन्स, आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थीनी येथे शिक्षण घेत आहेत. सध्या 30-35 मुली येथील मोफत शिकवणी वर्गाचा लाभ घेत आहेत. यंदाच्या वर्षीपासून हे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले असून 10 दिवसांपूर्वीच क्सासेला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच गावातील विश्वजीत ठोंबरे आणि डॉ. रमेश जाधवर यांनी 10 हजार रुपयांचे रजिस्टर या गरीब, गरजू आण होतकरू विद्यार्थीनींसाठी वाटप केले. कळंबसारख्या तालुक्यास्तरावरील शिक्षक आणि पत्रकारांचा प्रेरणादायी विचार इतरही तालुक्यातील विचारवंत नागरिकांनी आत्मसात केल्यास अनेक तालुकास्तरावर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा भार हलका होईल.