उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 07:16 PM2019-02-18T19:16:51+5:302019-02-18T19:20:36+5:30
शासनाने दुष्काळ जाहीर केला़ परंतु अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप
उस्मानाबाद : शासनाने दुष्काळ जाहीर केला़ परंतु अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह इतर मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे़ परंतु दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही़ प्रशासन दुष्काळी उपाय योजनांबाबत गंभीर नसून, दुष्काळी योजना फक्त कागदावरच राबविल्या जात आहेत़ शासनाच्या उदासीन धोरणामुळे चार वर्षात ११ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत़ सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, पूर्णवेळ कृषी मंत्री नियुक्त करावेत, शासन निर्णयानुसार सर्व कामकाज मराठीत व्हावे, रोहयो, मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर द्यावी, ग्रामस्थांना गावातच रोजगार द्यावा, टंचाई असणाऱ्या गावात टँकर सुरु करावेत, पशुंसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या़ आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, प्रशांत नवगिरे, आबासाहेब ढवळे, उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, महिलाआघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, दिनेश देशमुख, शब्बीर शेख, दादा कांबळे, मिलिंद चांडगे, दत्ता बोंदर, राहुल बचाटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़