सोनारी : विद्युत खांबाला स्पर्श झाल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने माकडाचा मृत्यू झाल्याची घटना परंडा तालुक्यातील सोनारी येथे सोमवारी घडली.
महाराष्ट्राच्या प्रमुख तीन कुलदैवतांपैकी एक असलेले परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान असून, येथे शेकडो वर्षांपासून हजारो माकडे वास्तव्यास आहेत. येथे विजेच्या तारांना स्पर्श होऊन माकडे व माकडांची पिल्ले दगावत असल्यामुळे तसेच रथमार्गावर विद्युत तारांचा अडथळा निर्माण होत असल्याने मध्यंतरी कोटिंग विद्युत वाहिनीचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी जिल्हा नियोजन विभागातून १ कोटी ९ लाख ४३ हजार १६० रुपये निधीची तरतूदही झाली; परंतु या कामाची मुदत संपून गेली तरी अद्याप हे काम अपूर्णच आहे. परिणामी, माकडांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात एक माकड विद्युत खांबावर विद्युत धक्का लागून मयत झाले. यापूर्वी ११ एप्रिल रोजी भवानीनगर भागात पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ विजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
चौकट...
सोनारी येथील काळ भैरवनाथ देवस्थान हे लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असून, येथील माकडे भैरवनाथ देवाची वानरसेना म्हणून प्रसिद्ध आहेत. विद्युत तारेला स्पर्श होऊन माकडे दगावत असल्याची बाब चिंताजनक आहे. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन कोटिंग विद्युत वाहिनी कामाला सुरुवात झाली. मात्र, काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे माकडे वारंवार दगावत आहेत.
- रवींद्र खुळे, ग्रामस्थ.
चौकट.....
सोनारी येथे कोटिंग विद्युत वाहिनीचे काम चालू आहे. मात्र, या कामासंदर्भात मला पूर्ण माहिती नाही. या कामाची मुदत वाढली आहे की नाही, याबद्दलही सविस्तर माहिती देता येणार नाही.
उपविभागीय अभियंता वानरे हे रजेवर आहेत. दोन-तीन दिवसांत माहिती घेतो.
- एस. जी. नायर, अभियंता, सोनारी उपकेंद्र.