उस्मानाबाद : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुलाला पॅरोल मंजूर व्हावा, यासाठी बोगसगिरी करणाऱ्या एका मातेविरुद्ध शहर ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेने जिल्हा शल्य चिकित्सकांचा बनावट शिक्का वापरात आणला होता.
कळंब तालुक्यातील अंधोरा येथील शहाजी गाडे हा एका गुन्ह्यात उस्मानाबादच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, त्याची आई कांचन गाडे हिला मुलाला पॅरोलवर सोडवून आणायचे असल्यास आपणास दुर्धर आजार असल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतर पॅरोल मंजूर होतो, अशी माहिती मिळाली. त्यामुळे मग कांचन गाडे हिने स्वत:ला दुर्धर आजार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक होते. मुळातच दुर्धर आजार नसल्याने असे प्रमाणपत्र मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे या महिलेने बोगसगिरीच्या मार्गाने जाण्याचा बेत आखला. जिल्हा शल्य चिकित्सकांचा बनावट शिक्का या महिलेने तयार करून घेतला. शिवाय, स्वाक्षरीचीही हुबेहूब नक्कल करीत बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. आपणास कर्करोग असल्याचे या प्रमाणपत्राद्वारे भासवून ते मुलाच्या पॅरोलसाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात सादर केले. ही बाब जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास नुकतीच आली. यानंतर प्रशासकीय अधिकारी महेश चव्हाण यांनी उस्मानाबाद शहर ठाणे गाठून याप्रकरणी कांचन गाडेविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार या महिलेविरुद्ध कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.