मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:36 PM2020-10-08T17:36:43+5:302020-10-08T17:39:21+5:30
गुरुवारी दुपारी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत उस्मानाबाद येथील महावितरण अधीक्षक अभियंता यांच्या कॅबिनची तोडफोड केली़
उस्मानाबाद : वीज बिलाबाबत नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी मनसेने काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र यावर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे गुरुवारी दुपारी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत उस्मानाबाद येथील महावितरण अधीक्षक अभियंता यांच्या कॅबिनची तोडफोड केली़
महावितरण कंपनीने मागील चार- पाच महिन्यांपासून ग्राहकांना जी बिले पाठविली आहेत़, ती वाढीव आहेत. तसेच वीज बील कमी करण्यासाठी ग्राहक गेले असता़ कर्मचारी, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वीज बील भरण्यासाठी तगादा लावत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सप्टेंबर महिन्यात वाढीव वीज बिल रद्द करण्यासंदर्भात निवेदने दिली होती़.
निवेदनही देऊनही महावितरण कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्या कॅबिनमधील खुर्च्यांची मोडतोड केली.