महावितरण जिल्हा परिषदेला जुमानेना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:01 AM2021-02-28T05:01:30+5:302021-02-28T05:01:30+5:30
वीजवाहक तारा शाळांवरच -उपाध्यक्ष, शिक्षणाधिकाऱ्यांची पत्रांना केराची टाेपली उस्मानाबाद - जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती तसेच आवारातून वीज कंपनीच्या ...
वीजवाहक तारा शाळांवरच -उपाध्यक्ष, शिक्षणाधिकाऱ्यांची पत्रांना केराची टाेपली
उस्मानाबाद - जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती तसेच आवारातून वीज कंपनीच्या विद्युत वाहकतारा गेलेल्या आहेत. अशा शाळांची संख्या सुमारे सव्वाशेच्या घरात आहे. या तारा स्थलांतरित कराव्यात, यासाठी उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडून सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. परंतु, वीज कंपनीचे अधिकारी मात्र, जिल्हा परिषदेला जमानायला तयार नाहीत. आजवर त्यांच्या पत्राला चक्क केराची टाेपली दाखविण्याचे काम झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या गावाेगावी सुमारे १ हजार ८९ शाळा आहेत. यातील जवळपास १२३ शाळा अशा आहेत, ज्यांच्या छतावरून, प्रांगणात विद्युत ट्रान्सफार्मर वा वीजवाहक तारा गेल्या आहेत. या तारा स्थलांतरित करण्यात याव्यात, यासाठी संबंधित मुख्याध्यापकांकडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. या कालार्यालयाने ही बाब शिक्षण विभागाला कळविली. साेबत छायाचित्रेही जाेडण्यात आली आहेत. यानंतर शिक्षण विभागाने शाळांच्या यादीसह उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने पत्र वीज कंपनीला दिले. या प्रक्रियेला काही महिन्यांचा कालावधी लाेटला. परंतु, महावितरणकडून प्रत्येक पत्राला केराची टाेपली दाखविण्याचे काम झाले आहे. त्यामुळे आजवर शाळांच्या छतावरून गेलेल्या ना तारा स्थलांतरित झाल्या ना ट्रान्सफार्मर. या प्रकाराबाबत पालकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चाैकट...
स्मरणपत्राचेही ‘विस्मरण’...
जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावंत यांच्या सूचनेवरून सातत्याने वीज कंपनीला स्मरणपत्रे दिली जात आहेत. परंतु, अशा पत्रांनाही वीज कंपनी गांभीर्याने घेत नसल्याने पदाधिकाऱ्यांचा वचक सैल झाला की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळेच वीज कंपनीला ‘शिक्षण’च्या स्मरणपत्राचे ‘विस्मरण’ हाेत असावे.
-तर जबाबदार काेण?
पावसाळ्यात प्रचंड वादळीवारे असते. माेठ-माेठी झाडे उन्मळून पडतात. शेतशिवारातील विद्युतपाेल आडवे हाेतात. अनेकवेळा दुपारच्या वेळी अशा घटना घडतात. याच वेळेत शाळाही सुरू असतात. त्यामुळे दुर्दैवाने अशी एखादी घटना घडल्यास त्यास जबाबदार काेण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.