उस्मानाबाद : नगर परिषदेच्या गाळ्यांसमोरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, बेशिस्त पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी नगर परिषदेकडून भाडेतत्त्वावर गाळे घेतलेल्या व्यापाऱ्यांनी शनिवारी बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पालिकेने तातडीने सेवा पुरवाव्यात, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहनधारकांस पादचाऱ्यांची वर्दळ असते. पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंचायत समिती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फुटपाथची निर्मिती केली आहे. मात्र, या फुटपाथवर बेशिस्त वाहनचालक वाहने पार्क करीत आहेत. शिवाय, याची ठिकाणी अनेक विक्रेत्यांनी स्टॉल लावलेले असतात. या स्टाॅलसमोरच अनेक वाहनचालक वाहने उभी करतात. शिवाय, नगर परिषदेचे भाडेतत्त्वावर व्यापारी घेतलेल्या गाळ्यांसमोरही वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग केलेली आढळून येते. याचा परिणाम गाळेधारक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे. याबाबत नगर परिषदेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप करीत गाळेधारक व्यावसायिकांनी शनिवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर सकाळी १०.१५ ते ११ वाजेदरम्यान रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुकेश नायगावकर, संजय कदम, विशाल पाटील, समयोद्दीन मणियार, इसामियाँ मोरवे, नितीन शेरखाने, प्रवीण कोकाटे, राजाभाऊ यादव, वैजिनाथ नरुणे, वसीम निचलकर, संजय अडवाणी यांच्यासह नगर परिषद गाळेधारकांची उपस्थिती होती.
वाहतुकीची कोंडी
सकाळी १०.१५ ते ११ वाजेदरम्यान गाळेधारकांच्या वतीने रास्ता राेको करण्यात आला. यावेळी न्यायालय परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ११ नंतर आंदोलन मागे घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली.