उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मोहा येथे अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा तीन वर्षांपूर्वी खून झाला होता़ यातील संजय मडके या आरोपीस अतिरिक्त सत्र न्या़एम़जी़ देशपांडे यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़
मोहा येथील संजय दिलीपराव मडके याच्या पत्नीसोबत येथीलच श्रीरंग शाहू भोईटे याचे अनैतिक संबंध होते़ याची कुणकुण संजयला लागली होती़ ६ सप्टेंबर २०१७ रोजी श्रीरंग व संजयची पत्नी बाहेर भेटणार असल्याची माहिती संजयला मिळाली होती़ मात्र, तत्पूर्वीच त्याने श्रीरंग भोईटे यास दुचाकीवर बसवून शेतात नेले़ तेथे या दोघांत वाद झाला़ यावेळी संजयने त्याच्या अल्पवयीन मुलास लोखंडी कत्ती घेऊन येण्यास सांगितले़ कत्ती हाती पडताच त्याने श्रीरंगच्या मानेवर, हातावर वार करून जिवे मारले़ तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर संजयने श्रीरंगचा मृतदेह व त्याची दुचाकी मोहा शिवारातील एका उसाच्या शेतात नेऊन टाकले़ मयताच्या दुचाकीची व मोबाईलची तोडफोड करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़
दरम्यान, याप्रकरणी १० सप्टेंबर २०१७ रोजी मयताचे वडील शाहू भोईटे यांच्या फिर्यादीवरुन येरमाळा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी डॉ़ नितीन कटेकर यांनी केला़ यानंतर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले़ अतिरिक्त सत्र न्या़एम़जी़ देशपांडे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी चालली़ सोमवारी अंतिम सुनावणी झाली़ यादरम्यान, सरकारी पक्षातर्फे एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले़ तसेच परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता आरोपीस दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली़ तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे़ सरकारी पक्षातर्फे अॅड़शरद जाधवर यांनी काम पाहिले़