परस्पर दिला तलाक, पतीसह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:44 AM2021-02-27T04:44:34+5:302021-02-27T04:44:34+5:30
उस्मानाबादच्या ख्वाजा नगर भागात सध्या माहेरी वास्तव्यास असलेल्या एका महिलेचा विवाह सहा वर्षांपूर्वी लातूरच्या बाळे गल्लीत राहणार्या एका तरुणाशी ...
उस्मानाबादच्या ख्वाजा नगर भागात सध्या माहेरी वास्तव्यास असलेल्या एका महिलेचा विवाह सहा वर्षांपूर्वी लातूरच्या बाळे गल्लीत राहणार्या एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतर एक वर्ष नीट वागणूक दिल्यानंतर पतीने या महिलेस त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नात मानपान नीट केले नाही, असे सांगत नंतर घरातील चौघांनी त्रास द्यायला सुरुवात केली. यादरम्यान, पतीने तिला मुंबईला नेले. तेथे तो रिक्षा चालवत होता. तेथेही त्याचा जाच सुरुच होता. लातूरला पुन्हा परत आल्यानंतर त्याने नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी मारहाण होऊ लागली. दरम्यान, महिलेच्या वडिलांनी १ लाख रुपये देऊन पुन्हा नांदण्यासाठी लातूरला पाठविले. मात्र, उर्वरित २ लाख रुपये आणण्याची मागणी करीत सासरच्यांनी पुन्हा माहेरी पाठवून दिले. यातच नुकताच तिच्या पतीने शरियत कायद्यानुसार तिला तलाक दिल्याचे प्रकटन वकिलांमार्फत दिल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने उस्मानाबाद शहर ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार चारही आरोपींवर शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.