Nagar Panchayat Election Result 2022: वाशीत भाजपचा शिवसेनेला दणका; सत्ता खेचून आणत मिळवले बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:50 PM2022-01-19T12:50:15+5:302022-01-19T12:50:59+5:30
Nagar Panchayat Election Result 2022: अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश कवडे यांनी १० जागा जिंकत नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलवले आहे़.
वाशी ( उस्मानाबाद ) : वाशी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने १० तर शिवसेने ७ जागा मिळवल्या. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या ताब्यातील सत्ता हिरावून घेतली आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या पत्नीस पराभवास सामोरे जावे लागले़.
अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश कवडे यांनी १० जागा जिंकत नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलवले आहे़. शिवसेनेचे प्रशांत चेडे यांच्या पॅनेलला ७ जागांवर समाधान मिळवता आले असून त्यांच्या ताब्यातून नगरपंचायतीची सत्ता गेली आहे. त्यांना अतिआत्मविश्वास नडला असल्याचे झालेल्या निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे़ कांही जागा या अल्पमताच्या फरकाने पडल्या आहेत़
भाजपाचे विजयी उमेदवार : पॅनेलप्रमुख सुरेश कवडे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून विजय मिळवला आहे़ प्रभाग क्रमांक १ मधून स्मिता अमोल गायकवाड, प्रभाग क्रमांक २ - वंदना सुहास कवडे, प्रभाग क्रमांक ३- श्रीकृष्ण लहू कवडे, प्रभाग क्रमांक ४़ विजया गायकवाड, प्रभाग क्रमांक ६़ विकास शिवाजीराव पवार, प्रभाग क्रमांक १२ संजना चौधरी, प्रभाग क्रमांक १५ वनमाला शिवाजीराव उंदरे, प्रभाग क्रमांक १६़ बळवंत श्रीमंत कवडे, प्रभाग क्रमांक १७ मधून भागवत भास्करराव कवडे हे विजयी झाले आहेत़
शिवसेनेचे विजयी उमेदवार : प्रभाग क्रं़५ दिग्विजय प्रशांत चेडे, प्रभाग क्रं़ ७ रोहिणी किशोर भांडवले़ प्रभाग क्रं़ ८ अलका सिध्देश्वर भालेकर, प्रभाग क्रं़ १० नागनाथ नाईकवाडी, प्रभाग क्रमांक ११ शिवहार स्वामी, प्रभाग क्रमांक प्रभाग क्रंमाक १३ शालन दत्तात्रय कवडे व प्रभाग क्रमांक १४ वर्षा विकास मोळवणे यांचा समावेश आहे़
निवडणुकीत माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, माजी उपनगराध्यक्ष पती प्रसाद जोशी यांच्या पत्नी स्वाती जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा बाळासाहेब सुकाळे यांना पराभवास सामोरे जावे लागले़ राष्ट्रवादी काँग्रेस ला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही़ काँग्रेस पक्षाने एक जागा लढवली होती त्याठिकाणीही त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे़
तहसिल कार्यालयाच्या सभागृहात चार टेबलवरती सहा फेऱ्यात सकाळी १० वाजता मतमोजणीस कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या अधिपत्याखाली प्रारंभ झाला होता़ सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी साडेआकराच्या आतच संपली़