मुरुम रूग्णालयातील ऑक्सिजन बेड नावालाच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:53+5:302021-05-03T04:26:53+5:30
मुरुम -शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरातील ग्रामीण रुग्णालयांत असलेले २० ते २५ ...
मुरुम -शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरातील ग्रामीण रुग्णालयांत असलेले २० ते २५ ऑक्सिजन बेड नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संकटात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड नसल्यामुळे या भागातील अत्यवस्थ रुग्णांना सातत्याने उमरगा, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर येथे उपचारासाठी रेफर करावे लागत आहे.
शहरासह ग्रामीण भागात आतापर्यंत एक हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या गेली आहे, तर दुसरीकडे तिसरी आणि चौथी लाट येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. पैसे देऊनही वेळेवर योग्य उपचार मिळणे अवघड झाले आहे. प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच कोरोनाच्या बाबतीत योग्य उपाययोजना शासनाने कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील लोकसंख्या २५ हजारांच्या पुढे आहे. याशिवाय परिसरातील पंधरा ते वीस गावांतील नागरिक मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या मुरुमच्या कोविड रुग्णालयात ७० रुग्ण उपचार घेत असले तरी केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरच उपचार केले जात आहेत. अत्यवस्थ रुग्ण ग्रामीण रुग्णालयात आला की त्याला पुढील उपचारासाठी उमरगा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर येथे डॉक्टरकडून रेफर केले जाते. ग्रामीण रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर तसेच ऑक्सिजन बेडची सुविधा असतानाही रुग्णांना रेफर करावे लागत असल्याने ग्रामीण रुग्णालयांतील ऑक्सिजन बेड केवळ नावालाच आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घातल्यास शहरातील ग्रामीण रुग्णालयांत असलेले ऑक्सिजन बेड येतील. परिणामी रुग्णांचे प्रमाण वाचतील.
चाैकट...
शहरातील ग्रामीण रुग्णालयांत २० ते २५ ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, त्याचा वापर होत नसल्याने ऑक्सिजनसाठी रुग्णांना रेफर करणे हे आता नेहमीचेच झाले आहे. रुग्णांची ही हेळसांड थांबवावी व ऑक्सिजन सुविधा सुरू करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्याकडे ३० एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केल्याचे बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी सांगितले.
मुरुम येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, ऑक्सिजनची सुविधा नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना रेफर करावे लागत असल्याने ऑक्सिजन सुविधा मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात सुरू करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
मुरुम शहर व परिसरातील गावांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन बेड आहेत. मात्र, ऑक्सिजन सुविधा पुरवण्याकडे आरोग्य विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आराेप भाजपा उद्याेग आघाडीचे अध्यक्ष श्रीकांत ऊर्फ राजू मिनीयार यांनी केला.