उस्मानाबाद : मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट असताना, यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे थंड पाण्यासोबत शीतपेयाची मागणी कमी झाली आहे. परिणामी, थंड पाण्याच्या जारची विक्री मंदावली आहे.
दरवर्षी उन्हाळा आला की, जारच्या माध्यमातून विक्री हाेणाऱ्या पाण्याची मागणी प्रचंड वाढत असते. तसेच बाजारपेठेतही दुकानदार उन्हाळ्यात थंड पाणी मागवून आपली तहान भागवत असतात. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुकाने बंद आहेत. शिवाय काही रुग्णालये, मेडिकलमध्ये कमी प्रमाणात जारचा वापर सुरू आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, पतसंस्थांमध्येही जारला मागणी होती. मात्र, कार्यालयातही १५ टक्केच कर्मचारी उपस्थिती करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयातून जारला मागणी घटली आहे. जारची मागणी कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या गाड्यांही अगदी कमी प्रमाणात फिरताना दिसत आहेत. जारद्वारे विकले जाणारे फिल्टरचे पाणी विकत घेण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. २० ते ३० रुपयांना मिळणारा जार दोन ते तीन दिवस वापरला जात होता. किमान एक व जास्तीत जास्त ४ ते ५ विकत घेतले जात होते. लग्नकार्य असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम, त्या ठिकाणी एका दिवसासाठी २५ ते ५० जार मागविले जात होते. कार्यक्रमांवरही बंधन आल्यामुळे जारचा व्यवसाय ठप्प झाला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जारच्या पाण्याची मागणी ७० टक्क्यांनी घटली आहे.
साध्या जारला पसंती
सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकजण शीतपेय, थंड पदार्थ तसेच थंड पाणी पिण्याचे टाळत आहेत. त्यामुळे थंड पाण्याच्या जारऐवजी साध्या जारला नागरिकांतून पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जार विक्रेत्यांसह कामगारांचे नुकसान
दरवर्षी उन्हाळ्यात विवाह समारंभ तसेच इतर उपक्रमांवेळी थंड पाण्याच्या जारला मागणी असते. शिवाय, पाणपोईसाठी मागील काही वर्षांपासून जारचे पाणीच ठेवले जात होते. मात्र, यंदा संचारबंदीमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी मोजक्याच उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे जार विक्रेत्यांसह कामगारांचे नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया...
माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. हॉटेल सुरू होते, तेव्हा प्रतिदिन मी चार ते पाच जार विकत घेत होतो. संचारबंदीमुळे हॉटेल बंद आहेत. त्यामुळे आता जार बंद केला आहे. कोरोना संसर्गामुळे थंड पाणी पिणे टाळत आहे. त्यामुळे घरीही साध्या पाण्याचा जार घेत आहे.
अशोक घोळवे,
हॉटेल व्यावसायिक
कडक ऊन असतानाही सध्या थंड पाणी पिणे टाळत आहोत. त्याऐवजी साध्या जारचे पाणी पिण्यास पसंती देत आहोत. फेब्रुवारी महिन्यात दररोज दोन थंड पाण्याचे जार घेतले जात होते. सध्या साध्या पाण्याचे दोन जार घरी घेत आहोत.
रोहित आवाड, नागरिक
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जारच्या थंड पाण्यास मोठी मागणी असायची. लग्न समारंभास २५ ते ५० जार खरेदी केले जात होते. थंडपेयाचे स्टॉल, हॉटेलमध्येही जारला मागणी होती. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे हाॅटेल बंद आहेत. तसेच लग्न समारंभास कमी व्यक्ती हजर राहत आहेत. त्यामुळे जारला मागणी घटली आहे. त्याचा फटका जार व्यावसायिकांना बसत आहे.
संदीप साळुंके, नागरिक