तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संख्या आणली निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:32 AM2021-02-20T05:32:49+5:302021-02-20T05:32:49+5:30
उस्मानाबाद - राज्यासाेबत जिल्ह्यातही काेराेनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. खबरदारीचा भाग म्हणून तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची ...
उस्मानाबाद - राज्यासाेबत जिल्ह्यातही काेराेनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. खबरदारीचा भाग म्हणून तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संख्या निम्म्यावर आणली आहे. तसेच वृद्ध आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे लेखी आदेश जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी निर्गमित केले आहे.
काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिरात दरराेज २० हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात हाेती. मात्र, मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यातही काेराेनाचा संसर्ग वाढला आहे. खबरदारीचा भाग म्हणून मंदिरातील दर्शन पासची संख्या निम्म्यावर आणली जाणार आहे. आता राेज केवळ १० हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर २ हजार पेड पास देण्यात येणार आहेत. दरम्यान, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व दहा वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारपासून केली जाणार आहे. दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे ३ दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे हे ३ दिवस आणि मोठ्या सण, उत्सवाला ३० हजार मोफत पास दिले जात होते. तर इतर दिवशी २० हजार मोफत पास दिले जात होते. मात्र सध्या ही संख्या निम्म्यावर आणली आहे. या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात येणार आहे.
चाैकट..
विनामास्क पुजारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई
गुरुवारी वीसजण विनामास्क आढळून आल्याने त्यांच्यावर प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून चार हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. यात देवीभाविक, पुजारी व मंदिर कर्मचारी यांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारपासून मंदिरात विनामास्क आढळून आल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांचा आर्थिक दंड लावण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक, पुजारी व शहरवासियांनी मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करावा, असे आवाहन व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ‘लोकमत’शी बाेलताना केले.