एका गुंठ्यात केवळ पावणेआठ किलाे हरभरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:32 AM2021-02-20T05:32:44+5:302021-02-20T05:32:44+5:30
उस्मानाबाद -यंदा हरभरा पिकाखालील क्षेत्रात माेठी वाढ झाली. परंतु, हे पीक ऐन घाटे भरण्याच्या अवस्थेत असतानाच घाटेअळी तसेच इतर ...
उस्मानाबाद -यंदा हरभरा पिकाखालील क्षेत्रात माेठी वाढ झाली. परंतु, हे पीक ऐन घाटे भरण्याच्या अवस्थेत असतानाच घाटेअळी तसेच इतर कीड राेगांनी घेरले. परिणामी उत्पादकता माेठ्या प्रमाणात घडली आहे. उस्मानाबाद पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने शिंगाेली शिवारात पीक कापणी प्रयाेग राबविला असता, एका गुंठ्यात केवळ ७.८७० किलाे हरभरा उत्पादन निघाले. त्यामुळे अशीच अवस्था अन्य भागांतही आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे.
गतवर्षी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच खरीप पिके काढणीला आली असताना जाेरदार पाऊस झाला. यानंतर परतीच्या पावसाने जिल्ह्याला झाेडपून काढले. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. एवढेच नाही तर रबी पेरणीही लांबली. चिबडाच्या शेतजमिनीत तर ज्वारी पेरणीचा कालावधी निघून गेल्यानंतर वाफसा आला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या हरभऱ्यासाेबतच गव्हाच्या पेरणीवर भर दिला. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याने पिकेही जाेमदार आली. परंतु, हरभरा पीक ऐन घाटे लागण्याच्या तसेच भरण्याच्या अवस्थेत असतानाच कीटराेगाने आक्रमण केले. जे शेतकरी आर्थिक परिस्थितीमुळे फवारणी करू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील एकेका हरभऱ्याच्या तिरींबीचे ३० ते ४० टक्के घाटे फस्त केले. त्यामुळे या कीडराेगाचा उत्पादकतेवर माेठा परिणाम झाला असल्याचे दिसून येते. सध्या कृषी विभागाच्यावतीने पीक कापणी प्रयाेग सुरू आहेत. १८ फेब्रुवारीला उस्मानाबाद तालुक्यातील शिंगाेली शिवारात उस्मानाबाद पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, कृषी विकास अधिकारी डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे यांच्या उपस्थितीत प्रयाेग राबविण्यात आला. यावेळी एका गुंठ्यात केवळ ७.८७० किलाे ग्रॅम एवढे अत्यल्प उत्पादन आले. हे प्रमाण विचारात घेतले अडीच एकरांमध्ये केवळ साडेसात ते पावणेआठ क्विंटल एवढे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहे. त्यामुळे यातून उत्पादनखर्चही निघणे कठीण आहे.