पवारांचे जवळचे नातलग आहेत उस्मानाबादचे उमेदवार, जाणून घ्या राणा जगजितसिंह कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:06 PM2019-03-22T20:06:45+5:302019-03-22T20:09:40+5:30

खासदार शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केली.

Osmanabad candidate Pawar's close relatives, who is Rana Jagjit Singh patil? | पवारांचे जवळचे नातलग आहेत उस्मानाबादचे उमेदवार, जाणून घ्या राणा जगजितसिंह कोण?

पवारांचे जवळचे नातलग आहेत उस्मानाबादचे उमेदवार, जाणून घ्या राणा जगजितसिंह कोण?

googlenewsNext

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या माढा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच बारामती येथील पक्षाच्या कार्यक्रमात उस्मानाबादसाठी राणा जगजीतसिंह यांची उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला फोन करून यासंदर्भात कळवल्याचेही पवार यांनी म्हटले. मात्र, राणा जगजितसिंह यांची उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादीकडून पुन्हा पाटील घराण्यातच तिकीट दिल्याचं दिसून येतं. पाटील कुटुंबीय हे पवार कुटुंबीयांचे जवळचे नातलग आहेत.  

खासदार शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केली. माढ्यातून संजय शिंदेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्यातून संजय शिंदेना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, शिवसेनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं नवीन चेहरा दिला आहे. उस्मानाबादसाठी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देत शिवसेनेनं नवीन डाव साधला होता. त्यानंतर, काही वेळातच पवार यांनी उस्मानाबादसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उस्मानाबादमध्ये पुन्हा एकदा राणा जगजितसिंह विरुद्ध ओमराजे असा सामना रंगणार आहे. मात्र, हा सामना विधानसभाऐवजी लोकसभेचा असणार आहे. दरम्यान, ओमराजे आणि राणा जगजितसिंह यांच्या भाऊबंदकीचा वाद चांगलाच चर्चेत असतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चांगलाच उफाळून येतो. त्यामुळे यंदाही उस्मानाबाद येथील निवडणूक रंगतदार होणार आहे. 

दरम्यान, पवार यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्यापासून येथील जागेवर राष्ट्रवादीने पाटील घराण्यातीलच उमेदवार दिला आहे. त्यानंतरच, 2009 साली पद्मसिंह पाटील खासदार बनून लोकसभेत पोहोचले होते. तर 2014 साली त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. तर, आता पद्मसिंह यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी हा 2004 पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता. पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह यांच्या बहिण आहेत. त्यामुळे पवार आणि पाटील कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध आहेत. पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्ये 20 वर्षापेक्षा अधिक काळ मंत्री राहिले आहेत. तर, 8 वेळा आमदार बनले आहेत. तसेच शरद पवार यांच्या एस काँग्रेसचे ते राज्य प्रदेशाध्यक्षही होते. त्यामुळे राणा जगजितसिंह हे त्यांचे राजकीय वारसदार बनून पुढे राजकारणात सक्रीय झाले आहेत.  

राणा जगजितसिंह हे 2014 मध्ये सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी 2 वेळा ते विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 32 व्या वर्षी ते महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. विधान परिषदेवरुन मंत्रीमंडळात समावेश असलेले सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येतो. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून पाटील कुटुंबीय राजकारणा सक्रीय असून स्थानिक स्वराज संस्थापासून ते खासदारकीमुळे देशाच्या राजकारणात त्यांचा सहभाग आहे. 
 

Web Title: Osmanabad candidate Pawar's close relatives, who is Rana Jagjit Singh patil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.