पारगाव (उस्मानाबाद ) : उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक अनुदान मिळावे या मागणीसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा अडविला.
खरीप २०१७ च्या हंगामात पिक कापणी प्रयोगातील त्रुटीमुळे उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सुमारे ७५ हजार शेतकरी सोयाबीन पिकाच्या विम्यापासून वंचित राहिले आहेत. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी वारंवार शासनाचे याकडे लक्ष वेधले. परंतु, याबाबत अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही. यंदाही पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या थकीत पीक विम्याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आ. पाटील यांच्यासोबत याप्रश्नी सविस्तर चर्चा करून बुधवारी या अनुषंगाने बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर राष्ट्रवादीने हे आंदोलन मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.