उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबावणीचा अहवाल प्रतिदिन सरकारला सादर केला जात आहे. त्यानुसार या उक्रमात उस्मानाबादने लातूर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांना मागे टाकत राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. असे असतानाही दिवसागणिक रूग्णसंख्या वाढू लागली आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. ही परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांतही आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करीत आहेत. थोडीबहुत लक्षणे आढळून आली तरी संबंधितांना नजीकच्या रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. एखादा व्यक्ती कोरोना सदृश्य वा अन्य अजार अंगावर काढत असेल तर ते या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर तातडीने उपचारही करता येत आहेत. दरम्यान, उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रतिदिन करण्यात येत असलेल्या सर्व्हेचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने शासनाला सादर केला जात आहे. त्यानुसार या उपक्रमामध्ये उस्मानाबादने राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. तर पहिल्या स्थानावर ठाणे जिल्हा आहे. उस्मानाबादला लागून असलेले सोलापूर, लातूर, बीडीसह अहमदनगर हे जिल्हे मात्र पिछाडीवर आहेत, हे विशेष.
२६ हजारावर कुटुंबांचा सर्व्हेमाझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने ६९१ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम घरोघरी जाऊन कुटुंबांची आरोग्य तपासणी करीत आहेत. २२ सप्टेंबर अखेर २६ हजार २१३ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या कटुंबांतील १ लाख १३ हजार ३० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
मुख्य सचिवांकडून कौतुक‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी ‘व्हीसी’द्वारे आढावा घेतला असता, राज्यात दुसºया क्रमांकावर असलेल्या उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाने कौतुक केले. ही गती यापुढेही कायम ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केली.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात उस्मानाबाद राज्यात दुसºया स्थानी आहे. कुटुंब सर्व्हेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या टीम घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची अरोग्य तपासणी करीत आहेत. सर्वांच्या सहकार्याने ही गती यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.-अनिलकुमार नवाळे, सीईओ, जिल्हा परिषद.