उस्मानाबाद : कोरोनाची सौम्य बाधा झालेल्या रुग्णास रुग्णाच्या सहमतीने आणि त्याच्या घरी योग्य सोय असेल तर गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशा रुग्णांना वैद्यकीय सल्ला व मदत देण्याकरिता खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा घ्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांवर कोविड रुग्णालये (डीसीएच, डीसीएचसी), कोविड केअर सेंटर्स (सीसीसी) येथे उपचार करण्यात येत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे आणि अशा रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय अधिकारी यांची यादी तयार करून शहरी व ग्रामीण भागात वार्डनिहाय खासगी वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्त करावे व त्यांना गृह विलगीकरणातील रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे व अशा रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्याबाबत आदेशित करावे, असा आदेश दिला आहे.