भूम (उस्मानाबाद ) : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरूद्ध भूम पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील रामेश्वर येथील बाळू महादेव दराडे याने विषारी द्रव प्राषण केल्याने त्यांना उपचारासाठी भूम ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पेशंटवर डॉ. संदीप जोगदंड हे उपचार करीत असतानाच येथे अक्षय जाधव (रा. रामेश्वर) हा आला. ‘तुम्ही पेशेंटवर कसले उपचार करता’? असा सवाल करीत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच डॉ. जोगदंड यांना मारहाण केली. यानंतर कर्मचाऱ्याच्या हातातून सलाईनची बाटली हिसकावून घेतली. ‘तुम्ही रूग्णांवर उपचार करीत नाहीत. तुम्हाला बघून घेतो’, अशा शब्दात धमकीही दिली. सदरील प्रकारानंतर डॉ. जोगदंड यांनी भूम पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अक्षय जाधव याच्या विरूद्ध मंगळवारी भादंविचे कलम ३५४, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.