कळंब (जि़उस्मानाबाद) : शहरातील साठेनगर भागात शनिवारी रात्री पारधी समाजाच्या दोन गटात जबर हाणामारी झाली़ यात झालेल्या गोळीबारात दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ या घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्यावरही जमावाकडून दगडफेक झाली आहे़ दगडफेक प्रकरणी २५ ते ३० जणांवर रविवारी गुन्हे दाखल झाले़ तर गोळीबारप्रकरणी दोघांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब शहरातील साठे चौकात पारधी समाजातील दोन गट शनिवारी रात्री सशस्त्र भिडले होते़ यात तलवारी, काठ्या, गुलेर तसेच बंदुकीचाही वापर झाला़ वाद जास्त चिघळल्यानंतर जमावातील दोघांनी गोळीबार केला़ यात विकास बापू पवार, बापू विष्णू धोत्रे हे दोघे छातीत गोळी घुसल्याने गंभीर जखमी झाले आहेत़ तर धारधार शस्त्राच्या हल्ल्यात राहुल बापू पवार हा गंभीर जखमी झाला, अशी फिर्याद विकास बापू पवार याने दिल्याने आरोपी पिंटु राजिंदर पवार, सचिन काळे (रा़ कळंब) या दोघांवर रविवारी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घटनेनंतर संशयितांची धरपकड करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही रात्री उशिरा जमावाने दगडफेक झाली. यानंतर पोलिसांची कुमक वाढवून कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत आहे़ आरोपींची धरपकड करण्यासोबतच वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली़
२५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल धरपकड करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच बेकायदेशीरपणे शस्त्रे वापरुन दहशत निर्माण केल्याचा गुन्हा २५ ते ३० जणांवर दाखल करण्यात आला आहे़