विनामास्क फिरणाऱ्यांचा ११ लाखांना खिसा ढिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:31+5:302021-05-04T04:14:31+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, मास्क वापरण्याच्या सूचना सातत्याने केल्या जात आहेत. तरीही सार्वजनिक ठिकाणी बेफिकीर फिरणाऱ्या ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, मास्क वापरण्याच्या सूचना सातत्याने केल्या जात आहेत. तरीही सार्वजनिक ठिकाणी बेफिकीर फिरणाऱ्या लोकांवर कटाक्ष ठेऊन मोठा दंड वसूल केला जात आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या तब्बल ३ हजारांवर नागरिकांना जवळपास ११ लाख रुपये दंड करण्यात आला आहे.
जिल्ह्यात १५ मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत दुकानांसाठीही निर्बंध घालून देण्यात आले आहेत. शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लागू आहे. रस्त्यावर विनाकारण फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढीस लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नियम मोडणाऱ्यांवर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. विनामास्क फिरणारे प्रामुख्याने पकडून त्यांना आर्थिक दंड केला जात आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ३ हजार ३३१ नागरिक पथकांच्या हाती लागले. त्यांनी मास्क न घालता, नियमांचा भंग केल्याने त्यांच्याकडून तब्बल १० लाख ९० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही असे बेफिकीर फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, नागरिकांनी नियम पाळून स्वत:सह इतरांचेही जीव वाचविण्यात योगदान द्यावे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
दुकानांना पावणेपाच लाख दंड...
१ व २ मे रोजी जनता कर्फ्यू असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. अशा सुमारे ८० दुकानांवर कारवाई करीत ती सील करण्यात आली आहेत. त्यांच्या आर्थिक दंडही वसूल करण्यात आला आहे. नियम व वेळेचा भंग करणाऱ्या वेगवेगळ्या १ हजार १७७ आस्थापनांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ७४ हजार ५७८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.