सात हजारांवर शेती पंपांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:42+5:302021-04-01T04:32:42+5:30
वाशी : थकीत वीज बिलासाठी महावितरणने १२० कोटी रुपये थकीत वीज बिलासाठी तालुक्यात जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. ...
वाशी : थकीत वीज बिलासाठी महावितरणने १२० कोटी रुपये थकीत वीज बिलासाठी तालुक्यात जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी तब्बल सात हजारांवर शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, याचा परिणाम शेतीपिकावर होत आहे. पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी काही काळ वीज सुरू केली जात असली तरी तीही सुरळीत मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वाशी तालुक्यात वीज कंपनीचे पारडी, तेरखेडा, येसवंडी, पारगाव, वाशी, पारा, बावी व पिंपळगाव (लिंगी) अशी आठ ३३/११ ची उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. याअंतर्गत शेतीपंपाचे १० हजार १८० ग्राहक असून, या ग्राहकांकडे वीज बिलाची १२० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणचे उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यापूर्वी तीन उपकेंद्रांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करून शेतीपंपांचे वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या वेळी ३० लाखांच्या आसपास वसुली झाली होती. यानंतर पुन्हा २९ मार्च रोजी ५ उपकेंद्रांतून ७ हजार २४८ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करून वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अगोदरच मार्च २०२० पासून कोरोनाच्या महामारीमुळे देशासह राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतातील धानास भाव नाही, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत वीज कंपनीने रब्बी हंगामातील पिके काढणीस आली असताना वीजपुरवठा खंडित करून कोंडित पकडलेले असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे आता वीजबिल कुठून भरावे? या विवंचनेत शेतकरी आहे़
चौकट.......
इतर अडचणींकडेही लक्ष देण्याची गरज
वीज कंपनीकडून अगोदरच शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा मिळत नाही. अनेक ठिकाणी डीपींची अवस्था दयनीय आहे. वीजवाहिन्या हाताला येतील अशा अंतरावर लोंबकळत असून, याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे थकीत बिलाची वसुली करतानाच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज भाई विनायक शेटे यांनी व्यक्त केली.
कोट......
वरिष्ठांच्या आदेशानुसार सध्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. पशुधनाची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये यासाठी दररोज एक तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपाची थकबाकी भरून वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे.
- रेणुका पत्की, अभियंता, वाशी