सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना केल्या घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:44+5:302021-03-31T04:33:44+5:30
भूम : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी सर्व ...
भूम : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका खास दूतामार्फत घरपोच करून विद्यार्थ्यांची सोय केली.
२७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील इयत्ता ५वी ते १२वीपर्यंतची शाळा, महाविद्यालये चालू होती, परंतु पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेऊन ऑनलाइन शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, दहावीच्या परीक्षा जवळ आल्या असून, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षाही झालेल्या नाहीत. त्यातच येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले दहावीमधील अनेक विद्यार्थी वाकवड, गोरमाळा, भोनागिरी आदी ठिकाणी राहतात. तेथे मोबाइल नेटवर्कची अडचण असल्याने, या मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्यास अडचणी निर्माण होतात. याची दखल घेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी सर्व विषयाचा प्रश्नपत्रिका संच दूतामार्फत विद्यार्थ्यांच्या घरपोच केल्या.
दरम्यान, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असून, ३१ मार्चपासून सराव परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु शाळा बंद झाल्यामुळे मुलांचा अभ्यास व्हावा व मुले शिक्षण प्रवाहात राहावीत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व विषय शिक्षक दररोज फोनद्वारे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आढावा घेणार आहेत. यासाठी मुख्याध्यापक तात्या कांबळे, काकासाहेब पवार, उत्रेश्वर पायघन, उमाकांत पाटील, महादेव पालके, अनंता झरकर, हरिश साठे आदी उपस्थित होते.