उमरगा : गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील स्थिती गंभीर होत आहे. सध्या तालुक्यातील ३१ सिंचन प्रकल्पापैकी केवळ तीन प्रकल्प शंभर टक्के भरलेले असून, उर्वरित प्रकल्पात ४० टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. दोन तलाव तर चक्क कोरडेठाक आहेत. एकीकडे पाणीसाठ्याची ही स्थिती असताना दुसरीकडे पावसाअभावी खरीप हंगामातील पिकेही हातची जाण्याची वेळ आली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकाची अवस्था दयनीय होत आहे.
तालुक्यात शेतजमिनीचे सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल खरीप हंगामातील पिकाकडे असतो. यंदा उडीद, मूग, तूर पेरणी क्षेत्र कमी आहे तर सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मध्यंतरी पावसाने थोडासा दिलासा दिल्याने पिकांना आधार मिळाला; मात्र गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस नसल्याने ऐन फुलोऱ्यातील आणि फळधारणेच्या अवस्थेतील सोयाबीनची स्थिती नाजूक होत आहे. दिवसरात्र राबून व पदरमोड करून जोपासणाऱ्या पिकांची अवस्था पाहून शेतकरी हतबल होत आहेत.
एकीकडे पावसाअभावी पिके संकटात असतानाच दुसरीकडे अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पाऊस न झाल्यास तालुक्यातील बहुतांश भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात ३१ सिंचन प्रकल्प असून, त्याचा फायदा पिण्याच्या पाणीपुरवठ्याबरोबरच शेतजमीन सिंचनासाठीदेखील होतो. सध्याच्या स्थितीत एकूण ३१ तलावात एकूण ४२.०९५ दलघमी प्रत्यक्षात पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा २८.२०७ आहे. त्याची टक्केवारी ३८.५९१ इतकी आहे.
चौकट.......
अशी आहे तलावांची स्थिती
मध्यम प्रकल्प
जकापूर ४०.४२४, तुरोरी ३३. ४७४,
ल. पा. तलाव : कोरेगाववाडी ३.४५१, कोळसूर १००,
साठवण तलाव : एकूरगा १४.२७३, बलसूर (क्र. १) १२.३४१, बलसूर (क्र. २) ४.०५८, वागदरी ६.६७९, तलमोडवाडी १०.५०७, डिग्गी ३६.०९०, चंडकाळ ०.०००, केसरजवळगा (क्र. १) : ४१.४३६, केसरजवळगा (क्र. २) ३८.७५१, भुसणी १०.४७७, गुंजोटी ११.२७४, कदेर २०.३७५, भिकारसांगवी १००, दाळींब ९.३५४, कसगी साठवण १७.८६२, दगडधानोरा १००, गुंजोटीवाडी १८.७२४, मुरळी ९.४४८, सरोडी ११.१५१, नारंगवाडी (२२.७२६), कोराळ (०.०००), सुपतगाव (६.३१३),
लघू पाटबंधारे तलाव
कुन्हाळी १५.८९६, कसमलवाडी ६.१७५, काळालिंबाळा १६.९४६, कोरेगाव १९.७१३, पेठसांगवी १६.२९३