‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Published: September 18, 2022 06:12 PM2022-09-18T18:12:58+5:302022-09-18T18:14:01+5:30
पत्रकार परिषदेत ‘आप’चे राज्य सदस्य खोत यांची माहिती
सूरज पाचपिंडे, उस्मानाबाद: तेरणा सहकारी साखर कारखान्याचा न्यायालयातील लढा थांबावा, याकरिता २२ सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या घरासमोर तर २३ सप्टेंबर रोजी माढा येथे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राज्य सदस्य यांनी दिली. शेतकरी सहकारी साखर कारखाना या विषयावरील भूमिका मांडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती.
यावेळी ॲड. खाेत म्हणाले, तेरणा सहकारी कारखान्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहा वेळा निविदा काढली. सहाव्या निविदेसाठी भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने वेळेत टेंडर भरल्याने बँकेने त्यांनाच कारखाना चालविण्यास दिला. मात्र, २० मिनिटे उशिरा आलेल्या टेन्वटी वन शुगर न्यायालयात गेले. अमित देशमुख व मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या वादात कारखाना सुरू होण्यास विलंब होत आहे. कारखाना बंद असल्याने ३५ हजार सभासद, एक हजार कर्मचारी अडचणीत आहेत.
कारखाना सुरू करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी बाभळगाव येथे अमित देशमुख यांच्या घरासमोर व २३ सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन देऊन न्यायालयातीन लढा थांबविण्याची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर वादी-प्रतिवादी यांनी न्यायालयात लढा सुरूच ठेवल्यास स्वाक्षरी मोहीम राबवून शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन घेऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे ॲड. खाेत म्हणाले.