ग्रामस्थांच्या दातृत्वातून मिटला स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:32 AM2021-01-03T04:32:24+5:302021-01-03T04:32:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तुळजापूर : एकीकडे एकेक इंच जागेसाठी, बांधासाठी भाव-भावकीची, भावा-भावांची भांडणे होऊन प्रकरणे एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत पोहोचत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : एकीकडे एकेक इंच जागेसाठी, बांधासाठी भाव-भावकीची, भावा-भावांची भांडणे होऊन प्रकरणे एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत पोहोचत असतानाच दुसरीकडे ढेकरीतील मुस्लिम बांधवांनी समाजहिताचा विचार करत स्वत:ची लाखो रुपयांची चार गुंठे जागा सर्वधर्मियांच्या स्मशानभूमीसाठी दान देऊन समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथील स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याने मयताच्या नातेवाईकांना जिल्हा परिषद शाळा मार्गावर रस्त्याच्याकडेला ऊन, वारा, पाऊस यासह अनेक अडचणींचा सामना करत मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते. तसेच उघड्यावर अंत्यविधी होत असल्याने शाळेत जाणाऱ्या लहान-लहान विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, जागाच नसल्यामुळे शासकीय योजनेतून स्मशानभूमी शेड उभारायची कुठे, असाही प्रश्न होताच. त्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या दुःखापेक्षा अंत्यविधी कोठे करावा, याचीच चिंता येथील ग्रामस्थांना सतावत होती.
अखेर ढेकरी येथील मुस्लिम बांधव शमशोद्दीन उस्मान शेख, जाखीर उस्मान शेख, चाॅंदसाहेब उस्मान शेख, नूरमोहमद उस्मान शेख यांनी आपल्या शेतातील चार गुंठे जमीन गावातील सर्व समाजांसाठी दान करून ती ग्रामपंचायतीच्या नावे केली. यामुळे गावातील मृत व्यक्तींच्या अंत्यविधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
कोट.....
गेली पन्नास वर्षे गावाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने रस्त्याच्याकडेला अंत्यविधी उरकावा लागत होता. यामुळे विविध अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. आता गावातील मुस्लिम बांधवांनी सर्व समाजांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीला जागा दान दिली आहे. ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावरही करण्यात आली आहे. त्यामुळे आता तातडीने प्रस्ताव तयार करून स्मशानभूमी शेड उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- वैशाली महाडिक, उपसरपंच