मुंबई - शिवसेनेन लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास तब्बल 2 लाख 27 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या रविंद्र गायकवाड यांचे तिकीट का कापले ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला असून याची कारणेही शोधली आहेत.
उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांना धक्का देत शिवसेनेने दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांचे सुपत्र ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ओमराजे यांची उमेदवारी जाहीर होताच, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांच्या गटात नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र, शिवसेनेनं रविंद्र गायकवाड यांचे तिकीट का कापले याची काही प्रमुख कारणे आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांपैकी बार्शी हा महत्वाचा आणि निर्णायक मतदारसंघ मानला जातो. मात्र, या मतदारसंघातील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनीही जाहीर सभेत रविंद्र गायकवाड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गायकवाड यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नसल्याचेही ते म्हणाले होते. तर, बार्शीकर जनतेतही विद्यमान खासदारांबाबत तीव्र नाराजी होती. केवळ मत मागायला येणारा खासदार म्हणून त्यांचा उल्लेख बार्शीमध्ये होत. त्यामुळे बार्शीकर मतदारांचा विचार 'मातोश्री'वर तिकीट फायनल करताना करण्यात आला आहे.
रविंद्र गायकवाड हे वादग्रस्त खासदार म्हणून माध्यमात चर्चेत राहिले आहेत. रविंद्र गायकवाड यांनी रमजान महिन्यात रोजा सुरू असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये कर्मचाऱ्याच्या तोंडात जबरदस्तीने भाकरी कोंबली होती. महाराष्ट्र सदनच्या स्वयंपाकघरातील हा किस्सा देशातील आणि प्रामुख्याने राज्यातील माध्यमांमध्ये चांगलाच रंगला होता. तर, एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना रविंद्र गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्यास चपलेने मारले होते. त्यानंतर, गायकवाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेही वादग्रस्त खासदार म्हणून रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले होते.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 'नॉट रिचेबल खासदार' अशी प्रतिमा रविंद्र गायकवाड यांची बनली होती. एअर इंडियाच्या प्रकरणामुळे त्यांचा फोन त्या काळात नॉट रिचेबल असल्याचं सांगत होता. त्यामुळे मतदारसंघात सपर्क नसलेले नेते आणि नॉट रिचेबल खासदार अशी त्यांची ओळख बनली होती. शिवसेनेतील तानाजी सावंत यांच्या गटाने आणि प्रामुख्याने ओमराजे निंबाळकर यांच्याही गटाने रविंद्र गायकवाड यांची प्रतिमा 'नॉट रिचेबल खासदार' असल्याचं मोठ्या प्रमाणात भासवलं. याचाही परिमाण रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करताना झाला.
मुंबईत गेल्या 15 दिवसांपासून शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाने तळ ठोकला आहे. काहीही झाले तरी रविंद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्याचा आग्रह या गटाने 'मातोश्री'वर केला आहे. त्यातच, तानाजी सावंत हे शिवसेना नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. मध्यतंरी, राजू शेट्टी यांच्यासोबतही वाद झाल्यानंतर मी शिवसेनेचा नेता आहे, असा दम तानाजी सावंत यांनी शेट्टींना भरला होता.
खासदार रविंद्र गायकवाड यांनी आपला पूर्ण खासदारनिधी (25 कोटी रुपये) खर्च केला आहे. विशेष म्हणजे 15 व्या पंचवार्षिकमधील लोकसभेच्या उर्वरीत खासदाराचाही निधी त्यांनी विकासकामांसाठी खर्च केला आहे. मात्र, केंद्रात सत्ता असतानाही या खासदार निधीशिवाय एकही योजना किंवा विकासकामाचा प्रकल्प रविंद्र गायकवाड यांनी आणला नाही. त्यामुळेही मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता, असे लोकमतचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी चेतन धानुरे यांनी म्हटले आहे.