तेर - उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील लाेकांची बेपर्वाई वाढतच चालली आहे. काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा घरातच मृत्यू झाला. यानंतर तरी खबरदारी घेणे गरजेचे असताना, नातेवाईकांनी अंत्यविधी परस्पर उरकला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेर येथील ६५ वर्षीय वृद्धास त्रास होत असल्याने ७ मे रोजी तेर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले हाेते. कोरोना चाचणी केली असता, अहवाल पाॅझिटिव्ह आला. परंतु रुग्णाची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यास उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात तेर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रेफर केले. यानंतर तातडीने संबंधित रुग्णास उस्मानाबाद येथे दाखल करणे गरजेचे हाेते. परंतु, नातेवाईकांनी तसे न करता थेट घरी नेले. संबंधित वृद्धाचा मध्यरात्री मृत्यू झाला. यानंतर सर्व नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी निरोप देण्यात आला. मृताच्या नातेवाईकांनी प्रशासनाला न सांगता शनिवारी अंत्यसंस्कार उरकला. कहर म्हणजे या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणवर लाेक उपस्थित होते. काेराेनाबाधित रुग्णाचा मृतदेह पॅक करून त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. अशा स्वरूपाची कुठलीही प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाैकट...
बेजबाबदारपणा थांबणार कधी?
उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे लाेकसंख्येने माेठे गाव आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. काेराेनाचा हा वाढता संसर्ग थाेपविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययाेजना केल्या जात आहेत. मात्र, त्या फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, हे उपराेक्त प्रकारावरून दिसून येते.