उमरगा : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने शहरातील खासगी दवाखान्यांना कोविड सेंटरची मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी विठ्ठलराव उदमले यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कमीत कमी ५०० बेडचे कोविड केअर सेंटर तत्काळ उभारणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शहरातील सर्व डॉक्टरांना विश्वासात घेऊन चर्चा करावी, उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर असल्यामुळे लसीकरण हे पंचायत समिती सभागृहात ठेवावे, उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करावा, कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण व पाण्याची व्यवस्था करावी, होम आयसोलेशन घेतलेल्या रुग्णांसोबत नियमित संपर्क ठेवण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, भाजीपाला मार्केट सिड फार्म, शिवपुरी रोड येथे स्थलांतरित करावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष संजय पवार, नगरसेवक बालाजी पाटील, युवक तालुकाध्यक्ष शमशुद्दीन जमादार, शहराध्यक्ष खाजा मुजावर आदींच्या सह्या आहेत.