तुळजापूर : हाथरस जिल्ह्यातील मागासवर्गीय तरुणीवर अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत रिपाइंच्या वतीने सोमवारी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हाथरस जिल्ह्यातील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडित मुलीच्या कुटूंबातील एकाही व्यक्तीला विश्वासात न घेता बेरात्री तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करणाऱ्या संबंधित पोलीस आधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, बाबसाहेब मस्के, प्रकाश कदम, केतन कदम, अरूण कदम, शुभम कदम, वडार समाज अध्यक्ष बाळू शिंगे, अरुण कदम, राज कदम, पृथ्वीराज कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.