पाथरुड : भूम तालुक्यातील नळीवडगाव ते घुलेवाडी हा रस्ता तीन किलोमीटरपर्यंत खड्डेमय झाला असून, रस्त्यावरील डांबरीकरण उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर मोठी आश्रमशाळा असल्याने तसेच घुलेवाडी गिरलगावही याच रस्त्यावर असल्याने मोठी रहदारी येथून होते.
देशी दारू जप्त
तुळजापूर : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील अपसिंगा येथे छापा टाकला. यावेळी तेथील एका किराणा दुकानालगत नामदेव गादे हे देशी दारूच्या बाटल्यांसह पथकास मिळून आले. हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन ठिकाणी छापे
लोहारा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ३० डिसेंबर रोजी लोहारा शहर व जेवळी येथे जुगार अड्ड्यावर छापे टाकले. यावेळी लोहारा येथे महेबूब मोमीन तर जेवळी येथे सुभाष सारणे यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.
दोघे जखमी
उस्मानाबाद : काजळा येथील सुनील ढवण हे २८ डिसेंबर रोजी शहरातील डीमार्टजवळील रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना कारने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात ढवण यांच्यासह मागे बसलेले मनोहर हे जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाज्यांचे दर घसरले
(फोटो)
ढोकी : सध्या बाजारात मेथी, शेपू, पालक यासारख्या पालेभाज्यांचे दर बरेच कमी झाले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले असून, दुसरीकडे गृहिणींना मात्र मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
डिग्गी, उंडरगावातील दारू अड्ड्यांवर छापे
उस्मानाबाद : उमरगा पोलिसांनी डिग्गी येथे ३१ डिसेंबर रोजी छापा टाकला. यावेळी लालसिंग चव्हाण हा त्याच्या राहत्या घरासमोर विदेशी दारूच्या नऊ बाटल्यांसह मिळून आला. तसेच लोहारा पोलिसांनी उंडरगाव येथे छापा टाकला. यावेळी दयानंद सूर्यवंशी हा स्वत:च्या दुकानासमोर देशी दारूच्या १२ बाटल्यांसह मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
उमरगा : तालुक्यातील माडज येथील सुरेश गहिनीनाथ कदम हे १५ डिसेंबर रोजी रामपूर फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरून कारमधून (क्र. एमएच २४/ व्ही ९१३०) जात होते. यावेळी रस्त्यालगत थांबलेले ज्योतीबा बाबुराव भोसले (रा. रामपूर) व त्यांच्या आई कलावती यांना या कारची धडक बसली. यात ज्योतीबा व त्यांच्या आई हे दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ज्योतीबा कदम यांनी ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरूम टाकल्याच्या कारणावरून मारहाण
वाशी : घरासमोरील भूखंडावर मुरूम टाकल्याच्या कारणावरून दोन गटांत शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील विजोरा येथे ३० डिसेंबर रोजी घडली. विजोरा येथे खोसे कुटुंबीयातील गोपीचंद पांडुरंग खोसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा नवनाथ श्रीपती खोसे व त्यांच्या कुटुंबीयासोबत वाद झाला. यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुन्या भांडणावरून दाम्पत्यास मारहाण
कळंब : जुन्या भांडणावरून पतीस होत असलेली मारहाण पाहून सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीसही मारहाण झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी मस्सा येथे घडली. मस्सा येथील हरिदास महादेव ताटे हे गावात ग्रामपंचायत गाळ्यासमोर बसले असताना आश्रोबा मोरे यांनी तेथे येवून जुन्या भांडणावरून ताटे यांना मारहाण केली. यावेळी ताटे यांच्या पत्नी सोडविण्यासाठी आल्या असताना वरील आरोपीने त्यांनाही मारहाण केल्याची फिर्याद हरिदास ताटे यांनी दिली. यावरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूई बिनविरोध ; खेडमध्ये चुरस
कसबे तडवळे : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुन्हा घोषित झाल्या. यामुळे परिसरातील खेड, खामगाव, तुगाव, रुई, कौडगाव या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, यातील रुई ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. खेड येथील दोन पॅनलमधील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच नेते मतदारांना नमस्कार, रामराम ठोकून मिरवू लागले आहेत. जणू काही मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार असा विश्वास त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसून येत आहे.
कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार
(डीसी फोटो : संतोष मगर ०२)
तामलवाडी :येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी मिथुन गायकवाड कोरोनामुक्त झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप ओहाळ, बीट अंमलदार गोरोबा गाढवे,आकाश सुरवर, सोमनाथ भालेकर, करीम शेख, पवन नागरगोजे, सहाय्यक फौजदार जी. बी. गिरी, महिला पोलीस कर्मचारी साळू कुडवे, तबस्सूम तांबोळी, ग्रामस्थ सुमित मसूते, दस्तगीर पटेल उपस्थित होते.