रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सौंदाना, वाकडी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 07:02 PM2019-01-28T19:02:01+5:302019-01-28T19:06:08+5:30

गावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे

As the road is not being repaired, boycott on the parliamentary elections; Saundana,wakadi villagers decision | रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सौंदाना, वाकडी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सौंदाना, वाकडी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्रामसभेत घेतला ठराव रस्त्यासह इतर प्रश्न सुटत नसल्याने घेतला निर्णय

कळंब ( उस्मानाबाद ) : गत दोन दशकांपासून गावाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावातील ग्रामस्थांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्वच निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत दोन्ही गावांनी हा एकमुखी निर्णय घेतला.

कळंब तालुक्यातील सौंदना अंबा व वाकडी (ई़) ही दोन गावे उस्मानाबादच्या टोकावरील आहेत़ मांजरा नदीच्या काठावर स्थिरावलेल्या यातील सौंदना गावाची जेमतेम दीड हजार तर वाकडी गावाची एक हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे़ मांजरामायच्या कृपेने गावशिवारत चांगली सुबत्ता असली तरी रहदारीचा रस्ता मात्र कायम मागसलेला. लातूर-कळंब या राज्यमार्गावरून सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावांना जोडणारा एक रस्ता कसाबसा झाला खरा परंतु, गत दोन दशकापेक्षा जास्त कालावधीपासून या रस्त्याची  ‘खड्डयात रस्ता की  रस्त्यात खड्डे’ अशी गत झालेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या साधारणत: पाच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर खड्ड्यांची मोठी घनता वाढली आहे. यामुळे ये-जा करतांना नाकीनऊ येत आहे. या खराब रस्त्यामुळे गावात ना राज्य परिवहन महामंडळाची बस येते ना, इतर वाहने सहजासहजी धावतात़ त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, रूग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे़ तसेच नित्य ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही दणक्यात प्रवास करावा लागत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सौंदना (अंबा) व वाकडी (ई) येथील ग्रामस्थांनी आगामी होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सौंदना अंबा येथे सरपंच डी.बी. देवकते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला़ रमेश पालकर यांनी हा ठराव मांडला तर रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले़ तसेच वाकडी (ई) येथे संजय महानवर सुचक असलेला ठराव संमत करण्यात आला. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे़

वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष
गावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. यासंबधी निवेदन, तक्र ही देण्यात आली़ परंतु, कोणताही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी या समस्याकडे लक्ष देत नाही़ त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या ठरावाची प्रत व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे सौंदना अंबा येथील सामाजीक कार्यकर्ते कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: As the road is not being repaired, boycott on the parliamentary elections; Saundana,wakadi villagers decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.