उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे सत्र कायम आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांनी पथकाद्वारे चरट्याचा माग काढणे सुरू केले. यातच सोमवारी उस्मानाबाद शहरातील वैराग रोड भागात राहणारा श्रीकांत सर्जेराव चव्हाण (२६) हा तरुण चोरीच्या संशयास्पद वस्तू वापरत असल्याची माहिती पथकाला खबऱ्याकडून मिळाली होती. त्या अनुषंगाने सोमवारी उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अविनाश मरलापल्ले, साईनाथ अशमोड, रंजना होळकर यांच्या पथकाने वैराग रोडवरील कुंभार गल्लीत राहणाऱ्या श्रीकांत चव्हाण यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता उस्मानाबाद शहर, तुळजापूर येथील चोऱ्या, लूटमारीत तो सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाने त्यांच्याकडून उस्मानाबाद शहरातील चोरी व लूटमारीतील ३५ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या ताब्यात घेतल्या आहेत. तसेच उस्मानाबाद व तुळजापूर शहरातील चोरीतील प्रत्येकी एक स्मार्टफोनही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. गजाआड आरोपीकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होणार आहे, असे तपास गुन्हे शाखेने सांगितले.
वाँटेड दरोडेखोर, ठग झाले गजाआड
उस्मानाबाद : दरोडा तसेच फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे करुन पसार झालेल्या तीन वाँटेड आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी गजाआड केले आहे. या तिघांनाही पुढच्या तपासासाठी नळदुर्ग व आनंदनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी दरोडा टाकून आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अक्षय नामदेव साळुंखे (२५) व रत्नाकर सिद्धेश्वर दळवे (२०, रा.बळेवाडी, ता.बार्शी) यांच्या मागावर पोलीस होते. ते गावाकडे परतल्याचे समजताच सपोनि भुजबळ, कर्मचारी काझी, साळुंखे, ठाकूर, शेळके, संतोष गव्हाणे, अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, सर्जे यांनी त्यास ताब्यात घेतले. याच पथकाने आनंदनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा असलेला आरोपी महादेव लहुजी जाधव (रा.कौडगाव) यास औरंगाबाद येथून गजाअाड केले आहे. या आरोपींना संबंधित ठाण्याच्या हवाली करण्यात आले.