तामलवाडी - काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन करण्यात आले आहे. आठवडी बाजार बंद आहेत. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पिंपळा (बु.) येथील अशाच एका शेतकऱ्याने सुमारे चार महिने कष्टाने पिकविलेल्या दाेन एकरांतील भेंडीवर राेटाव्हेटर फिरवला आहे.
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील शेतकरी ॲड. गजानन चाैगुले यांची तामलवाडी साठवण तलावाला लागून शेतजमीन आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी जवळपास दाेन एकर क्षेत्रात भेंडीची लागवड केली हाेती. पाण्यासाठी ठिकबचा वापर करण्यात आला. भेंडी लागवड, बियाणे, खत, फवारणी ते फळ धारणा हाेईपर्यंत या पिकावर सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा खर्च झाला. ही भेंडी बाजारपेठेत पाठविण्याची तयारी असतानाच काेराेनाची दुसरी लाट दाखल झाली. संसर्ग वाढल्याने बाजारपेठा बंद करण्यात आल्या. कष्टाने पिकविलेली ही भेटी शेतातच कुजून चालली. या पिकाच्या माध्यमातून लागवडीवर झालेला खर्चही हाती पडला नाही. या प्रकारामुळे संतप्त हाेऊन शेतकरी चाैगुले यांनी सुमारे दाेन एकरांवरील भेंडीच्या पिकावर राेटाव्हेटर फिरविला.
चाैकट...
सात रुपये किलाेने विक्री...
सध्या बाजारात भेंडीला केवळ सात रुपये किलाे याप्रमाणे दर मिळत आहे. ताेडणीसाठी एका दिवसाची मजुरी तीन हजार रुपये जाते. त्यामुळे भेंडी ताेडणीचा खर्चही हाती पडत नव्हता. या प्रकाराला वैतागून शेतकरी चाैगुले यांनी सुमारे २ एकरांवरील भेंडीच्या पिकावर राेटाव्हेटर फिरविला.
काेट...
पिंपळा (बु.) व पिंपळा खुर्द या दोन गावांच्या शिवारात शेती येते. यातील दाेन एकरांत भेंडी लागवड केली हाेती. हे पीकही जाेमदार आले हाेते; परंतु बाजारपेठेत भेंडीला दरच नाही. त्यामुळे उपराेक्त दाेन्ही गावांतील ग्रामस्थांना भेंडी घेऊन जाण्याचे आवाहन केले हाेते. त्यानुसार अनेक शेतकरी भेंडी घेऊन जात हाेते.
-ॲड. गजानन चाैगुले, शेतकरी.