कळंब -ज्या केश कर्तनालयावरच प्रपंचाची मदार; त्यासही कोरोनाने ‘लॉकडाऊन’ केले. या हतबल अवस्थेतच त्यांनी आपल्या चिमुकलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कळंबच्या ‘ऑक्सिजन ग्रुप’ला दहा जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देऊन आपले समाजभान जपले आहे. त्यांच्या या लाखमोलाचे दानतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कळंब येथील धनजंय वसंतराव काळे यांचे मेन रोडवर केश कर्तनालय आहे. ते चालवूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या प्रपंचाची सारी मदार याच दुकानावर आहे.
या स्थितीतच कोरोनाचा प्रकोप शहरात वाढला. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात काळे यांचे दुकानही महिनाभरापासून ‘लॉकडाऊन’ आहे. यामुळे इतर खर्च सुरू असतानाच उत्पन्नाचा 'सोर्स' मात्र ठप्प झाला आहे.
यातच एक रुग्णाला ऑक्सिजन बेड न मिळाल्याने जगाचा निरोप घ्यावा लागला, हे वृत्त त्यांच्या मनाला भिडले. याच दरम्यान कळंब शहरात ‘ऑक्सिजन’ ग्रपने ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्याची धडपड वास्तवात आणली होती.
त्यांनी रुग्णवाहिका, तिची चाके, सर्व्हिसिंग यासाठी केलेली धावपळ पाहिली होती. यामुळे सामाजिक जान व भान असलेल्या धनंजय काळे यांनी आपल्या दहा वर्षांच्या संस्कृतीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कळंबच्या ऑक्सिजन ग्रुपला दहा जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भेट दिले.
ऑक्सिजन ग्रुपचे हर्षद अंबुरे, अकीब पटेल, अशोक काटे, नीलेश होनराव यांच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली. आपण स्वतः लॉकडाऊनमुळे संकटात असताना काळे यांनी एका धडपड्या मंडळींच्या प्रयत्नांना दिलेला हा ‘श्वास’ निश्चितच लाखमोलाचा असून, कठीण काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या या हातांचे कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया...
कोरोनाची भयानक स्थिती पाहून सर्वांचे मन विचलित झाले आहे. तीच अवस्था माझीही झाली. यातच ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू ही बातमी मनाला भेदून गेली. आपणही समाजास काही देणे लागताे, या भावनेतून मी माझ्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दहा जम्बो सिलिंडर ऑक्सिजन ग्रुपला दिले आहेत.
- धनंजय काळे, कळंब.