समाधान शिकेतोड यांचा नवोपक्रम विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:25 AM2021-01-10T04:25:05+5:302021-01-10T04:25:05+5:30
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित नवोपक्रम स्पर्धेत येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील ...
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित नवोपक्रम स्पर्धेत येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषय सहायक समाधान शिकेतोड यांनी सादर केलेल्या नवोपक्रमास औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळाला. या वर्षीच्या स्पर्धेत ‘भाषा विषयाच्या पाठावर अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव देण्यासाठी इयत्ता चौथीमधील पाठावर व्हिडिओ निर्मिती’ हा नवोपक्रम सादर करण्यात आला होता.
भाषा विषयाच्या एका पाठावर कशा पद्धतीने अध्ययन अनुभव घ्यावेत याचा व्हिडिओ शिकेतोड यांनी तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा शाळेतील उपक्रमशील शिक्षक विशाल अंधारे यांच्या मदतीने तयार केला होता. हा व्हिडिओ शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना दाखविण्यात आला. यासाठी त्यांना मराठी विभागप्रमुख नारायण मुदगलवाड, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर इब्राहीम नदाफ तसेच विषय सहायक नेताजी चव्हाण, तानाजी खंडागळे, प्रभाकर पांचाळ यांनी सहकार्य केले.
चौकट.......
शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत
नवोपक्रमाच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्ती आधारित काम करण्यासाठी दिशा मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यासाठी मदत होईल, असे मत डायटचे प्राचार्य बळीराम चौरे यांनी व्यक्त केले. तर या नवोपक्रमाच्या माध्यमातून भाषा विषयाच्या शिक्षकांचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. तसेच शिक्षकाचे मुलांसोबतचे दररोजचे काम रचनात्मक पद्धतीने घडून येईल, असे मत मराठी विभागप्रमुख नारायण मुदगलवाड यांनी व्यक्त केले.