कळंब : जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणारी मुले गुणवत्तेत यत्किंचितही कमी नाहीत याचा ‘दाखला’ पुन्हा एनएमएमएस परीक्षेच्या निकालावरून प्राप्त झाला असून, तालुक्यातील कष्टकऱ्यांच्या ३७ मुलांच्या पुढील चार वर्षांत शिष्यवृत्ती म्हणून तब्बल १८ लाखांची रक्कम हाती पडणार आहे.
बहुतांश गावात शिक्षणाची धुरा जिल्हा परिषदेच्या शाळांवर आहे. गावात अन्य शैक्षणिक शाखा नसल्याने वर्षानुवर्षे या जिल्हा परिषद शाळाच पर्याय असून, आता तिसऱ्या पिढीची मुले येथे धडे गिरवत आहेत. अशा या शाळेतील अधिकांश मुले ही बहुधा शेतकरी, कष्टकऱ्यांची असतात. शहराच्या तुलनेत साधनसुविधांचा अभाव असतानाही मागच्या दशकभरात जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकली आहे. या बदलात उपक्रमशील, टेक्नोसॅव्ही शिक्षकवृंदाचा मोठा वाटा आहे. याचाच प्रत्यय राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून येत आहे. दीड लाखापेक्षा कमी उत्पन्नाच्या दुर्बल कुटुंबातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी बळ देण्यासाठी गुणवत्तेच्या आधारे ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते.
आठवीच्या विद्यार्थ्यांना यात सहभाग घेता येतो, तर शिष्यवृत्तीधारक झाल्यावर पुढील चार वर्षांपर्यंत प्रतिवर्ष १२ हजारांची शिष्यवृत्ती मिळते. यंदा राज्य परीक्षा परिषदेने एप्रिलमध्ये घेतलेल्या या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, यात जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २०९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यात एकट्या कळंबचे ५३ तर यात जिल्हा परिषद शाळेतील ३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
चौकट...
२५ लाखांच्या शिष्यवृत्तीचा लाभ
तालुक्यातील ५३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून, त्यांना चार वर्षांत प्रत्येकी ४८ हजारांप्रमाणे २५ लाख ४४ हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे ३७ तर खासगी संस्थाच्या १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असे गटशिक्षणाधिकारी एम. पी. तोडकर यांनी सांगितले.
असे आहे परीक्षेचे स्वरूप
एमएमएस परीक्षेत सॅट आणि मॅट असे प्रत्येकी ९० गुणांचे दोन पेपर असतात. यात वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नावली असते. एकूण ४० टक्के गुणधारक पात्र ठरतात तर प्रवर्गनिहाय मेरीटनुसार ‘शिष्यवृत्तीधारक’ ठरतात. आम्ही कोरोनाकाळात ग्रुप करून तास घेतल्याचा फायदा झाला असे, नागझरवाडीचे मार्गदर्शक एस. जी. हिंगमिरे यांनी सांगितले.
जि. प. शाळांची मुलंच भारी..
जिल्ह्यातील २०९ पैकी ३७ विद्यार्थी कळंब जिल्हा परिषद शाळेचे असून, यात एकट्या मस्सा शाळेचे १९ आहेत. याशिवाय खामसवाडी ८, नागझरवाडी ५, शिराढोण ३ आहेत. मस्सा शाळेत शिक्षक ए. एम. काझी यांचे प्रयत्न पुन्हा कौतुकास्पद ठरले आहेत. सातत्यपुर्ण प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असल्याचे ए. एम. काझी यांनी सांगितले.