उमरगा -काेराेनाचा धाेका अद्याप टळलेला नाही. असे असतानाच नवीन शैक्षणिक वर्षास मंगळवापासून सुरूवात झाली. अशाही अडचणीच्या काळात दाबका शाळेतील शिक्षकांनी शाळा विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रम राबविला. या माध्यमातून पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतात. शिक्षकही नवागत विद्यार्थ्यांचे त्याच उत्साहाने स्वागत करतात. परंतु, यंदा काेराेनाचे संकट आहे. धाेका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तूर्तास शिक्षकांचीच शाळा सुरू झाली आहे. अशा संकटाच्या काळातही उमरगा तालुक्यातील दाबका येथील शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पालकांना ऑनलाईन अध्यापना संदर्भात माहिती देण्यात आली. सरपंच कुसुम मुटले,उपसरपंच गोविंद मेजर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंगद गायकवाड,उपाध्यक्ष अनुराधा राम गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ प्रा.डाॅ. शौकत पटेल यांच्यासह पालकांनी या उपक्रमाचे काैतुक केले. मुख्याध्यापक एस. आर. वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.